‘सुपरफास्ट’ रस्ता ठरतोय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 10:46 PM2019-12-09T22:46:23+5:302019-12-09T22:47:04+5:30
चाळीसगाव येथील भडगाव रोडवरील स्थिती : स्पीडब्रेकर नसल्याने दरदिवशी अपघात, नागरिक उभारणार आंदोलन
चाळीसगाव : बहुतांशीवेळा खराब आणि खड्डेमय रस्त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असतात. चकाचक आणि सुपरफास्ट रस्त्याविषयी नागरिकांना हायसे वाटते. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे रस्ता सुफरफास्ट असूनही तो डोकेदुखी कसा ठरतो, हे भडगाव रोडवरील वाढते अपघात पाहता सहज लक्षात येते. हा रस्ता जळगाव - चांदवड महामार्गावर असल्याने त्याचे काम पूर्ण होत आहे. ठिकठिकाणी स्पीडब्रेकर नसल्याने दरदिवशी रहदारी व वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे. तातडीने स्पीडब्रेकर टाकावेत, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
जळगाव - चांदडवड मार्ग चाळीसगाव शहरातून जातो. भडगाव रोडमार्गे त्याचा शहरात प्रवेश होतो. खरजई नाका ते सिग्नल चौक हा प्रचंड वर्दळीचा व रहदारीचा भाग असून येथे मोठा रहिवासही आहे. साहजिकच रस्त्यावर नेहमीच पादचारी, सायलस्वार यांचीही गर्दी मोठी असते.
रस्त्याचे दुपदरीकरण लवकरच पूर्ण होऊ घातले आहे. किरकोळ कामे वगळता शहरातर्गत ९० टक्के रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. रस्ता चकाचक आणि सुपरफास्ट झाला असताना तो नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. नव्याने रस्ता तयार करताना त्यावर जुन्या रस्त्यानुसार ठिकठिकाणी स्पीडब्रेकर टाकणे गरजेचे होते. परंतु, मागणी करुनही स्पीडब्रेकर टाकले न गेल्याने नागरिक व रहिवासी संतप्त आहेत.
नागरिाकंची मोठी वर्दळ
खरजई नाका ते सिग्नल चौक या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. याच भागात प्राथमिक व माध्यमिक शाळा, बँक, एलआयसी कार्यालय, पाच मंगल कार्यालय, बँकांचे एटीएम, चार पेट्रोलपंप, अंधशाळा, मुला - मुलींचे वसतिगृह, चार चौक, खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांची जनसंपर्क कार्यालये, अशी नागरिकांची मोठी वर्दळ असणारी गर्दीची ठिकाणे आहेत.
डॉ. पूर्णपात्रे माध्य. विद्यालय, वाणी मंगल कार्यालय, कापड गिरणी, कॅप्टन कॉर्नर, अंधशाळा चौक, बसस्थानक, एलआयसी कार्यालय, खरजई नाका आदि ठिकाणी तातडीने स्पीडब्रेकर टाकणे आवश्यक व गरजेचेही आहे. डॉ. पूर्णपात्रे शाळेजवळ सकाळी, दुपारी आणि सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. यामुळे येथे स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक लावणे क्रमप्राप्त आहे. स्पीड ब्रेकर न टाकल्यास या भागात मोठे अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते. असे प्रसंग घडल्यास नागरिकांच्या संतापाचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. तातडीने दखल घ्यावी. अशी मागणी जोर धरत आहे. विवाह सोहळ्यांची लगबग असल्याने मंगल कार्यालये गदीर्ने ओंसाडून वाहत आहेत. रस्त्यावर कुठेही 'दिशादर्शक व इतर माहिती' देणारे फलक लावलेले नाहीत. शाळेत जाणा-या दोन ते अडीच हजार विद्यार्थी व पालकांची वर्दळ असते. काही विद्यार्थी सायकलवर तर काही विद्यार्थी बस व आ?टोरिक्षाने शाळांमध्ये येतात. अशावेळी सुसाट रस्त्यावरुन भरधाव वेगाने येणारी वाहने अपघातास निमंत्रण देणारी ठरत आहे.