बाधित झाला बरा, नातेवाईक मात्र अडकूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:10 PM2020-05-29T12:10:41+5:302020-05-29T12:11:13+5:30
संशयितांचा जीव टांगणीला : अहवाल विलंबाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
जळगाव : एक बाधित रुग्ण बरा होऊन घरी पोहचला मात्र, त्याच्या संपर्कातील त्याच्या नातेवाईकांचे अहवालच नसल्याने ते अजूनही क्वारंटाईन सेंटरमध्येच अडकून असल्याचा प्रकार जळगावात समोर आला आहे़ यामुळे प्रलंबित अहवालांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़ याबाबत वांरवार तक्रारी व अनेक गंभीर बाबी समोर येऊनही वेळेवर अहवाल मिळत नसल्याने संशयितांचा जीव टांगणीला आहे़
जिल्हाभरात अहवाल प्रलंबीत राहत असल्याचा मुद्दा पुन्हा एका प्रामुख्याने समोर आला आहे़ प्रयोगशाळा सुरू होऊनही मर्यादा कमी व संशयितांची संख्या जास्त असल्याने दररोज ४०० पेक्षा अधिक संशयितांचे नमुने दररोज प्रतिक्षेत राहत असून यामुळे संसर्गाचा धोका तर आहेच, मात्र, रुग्णांचे मानसीक खच्चीकरण व त्रास याचा धोका बळावला आहे़
अनेक लहान मुलांनाही ताटकळत रुग्णालयात राहावे लागत आहे़ अहवाल वेळेवर मिळावे यासाठी कोविड रुग्णालयात सुक्ष्मजीव शास्त्र विभागाची कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे़ मात्र, यातही मर्यादेत अहवाल येत आहेत़
शिवाय काही दिवसांपूर्वी धुळे येथे अहवाल पाठविले जात नव्हते, मात्र, दोन दिवसांपूर्वी धुळे येथे काही अहवाल पाठविण्यात आले होते़
क्वारंटाईन सेंटर फुल्ल
एकट्या जवळगाव शहरातून रोज किमान ८० अहवालांची तपासणी होत असताना प्राप्त अहवालांची संख्या अगदीच नगण्य आहे़ अशा स्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात असलेले क्वारंटाईन सेंटर फुल्ल झाले असून अहवाल येत नसल्याने रुग्ण अधिकच भितीत राहत असल्याचे समोर येत आहे़ यामुळे डॉक्टरांचीही अधिकच डोकेदुखी वाढली आहे़ अशा स्थितीत संपर्कातील व्यक्तिंचे तपासणी अहवाल तरी किमान लवकर यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़
असेही उदाहरण... बाधित व्यक्तिला १९ रोजी तर त्यांची पत्नी, मुलगा व मित्राचे नातेवाईक असे चौघांना २१ रोजीच क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते़ आठ दिवस संबधित रुग्णाला बरे झाल्याने घरी सोडण्यात आले मात्र, त्यांच्या नातेवाईकांचा तपासणी अहवालच नसल्याने ते गुरूवारी सांयकाळपर्यंत क्वारंटाईनसेंटरमध्येच अडकून होते़