जळगावात अनोखा सेवाभाव, उदरभरणाच्या अखंड यज्ञकर्मासह जनजागृती व आरोग्य रक्षणाचे व्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:54 PM2018-04-11T12:54:29+5:302018-04-11T12:54:29+5:30

‘सेवालया’च्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, कृषी, संस्कार व स्वावलंबनाचे धडे

Health care with fasting in jalgaon | जळगावात अनोखा सेवाभाव, उदरभरणाच्या अखंड यज्ञकर्मासह जनजागृती व आरोग्य रक्षणाचे व्रत

जळगावात अनोखा सेवाभाव, उदरभरणाच्या अखंड यज्ञकर्मासह जनजागृती व आरोग्य रक्षणाचे व्रत

googlenewsNext
ठळक मुद्देअन्नदानातून रुग्णांना दिलासागरजू आणि दात्यांमधील दुवा

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ११ - उपचारासाठी आलेला गोरगरिब रुग्ण अथवा त्याचा नातेवाईक भुकेल्यापोटी राहू नये यासाठी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणाऱ्या ‘सेवालय’च्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात रुग्ण सेवा सुरू आहे. वर्षातील एकही दिवसाचा खंड न पडणाºया या उदरभरणाच्या यज्ञकर्मासह सेवालयाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, कृषीविषयक मार्गदर्शन, संस्काराचे धडे देण्याचे व्रतदेखील सेवेकरींनी हाती घेतले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे ‘सेवालय’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबविले जात आहे. यामुळे अनेकांना आधार मिळत आहे. यासाठी शहरासह जिल्ह्यातील सेवेकरींनी स्वत:ला या कार्यात झोकून दिले असून त्यांच्या या कार्याची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयात सेवालयाच्या पदाधिकाºयांच्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी ज्येष्ठ पदाधिकारी दीपक घाणेकर, समितीचे अध्यक्ष मनीष काबरा, सहकार्यवाह संदीप कासार, नरेंद्र शुक्ल, डॉ. रितेश पाटील, पराग महाशब्दे, कीर्तीकुमार पाठक, महेंद्र साखरे, गणेश जाधव, पितांबर कोळी, निंबा सैंदाणे, रेवती ठिपसे, डॉ. रेवती गर्गे, मंगला पाटील, वृषाली तोंडापूरकर, युवराज सपकाळे, अजित तडवी, हर्षल पाटील उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.
अन्नदानातून रुग्णांना दिलासा
जिल्हा रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण अथवा त्याचे नातेवाईक यांच्या जेवणाची व्यवस्था नसल्यास त्यांना अन्नदानाचे कार्य सेवालयाच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. सेवालयाचे सेवेकरी रात्री आठ वाजता रुग्णालयात फेरफटका मारुन अशा रुग्णांची निवड करतात. सकाळी १० वाजता सर्वजण सेवालयाजवळ एकत्र येऊन ११ वाजता सर्वांना जेवण दिले जाते. विशेष म्हणजे या वेळी भोजनमंत्र म्हणत अन्नपूर्णा मातेचे पूजनदेखील केले जाते. शहरात कोणीही नातेवाईक नसताना व जेवण विकत घेऊ शकत नसलेल्यांच्या उदराला या अन्नाचा ज्यावेळी आधार मिळतो, त्या वेळी त्यांच्या चेहºयावर तृप्ततेचे हास्य फुलते, असे अनुभव या वेळी सेवेकरींनी सांगितले.
गरजू आणि दात्यांमधील दुवा
या अन्नदानासाठी अनेक दानशूर व्यक्ती मदत करीत असतात. कोणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, पुण्यस्मरण असल्यास त्या निमित्ताने अनेक जण येथे अन्नदान करतात, असे या वेळी सांगण्यात आले. राजकीय मंडळी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांचे यासाठी सहकार्य मिळते. वर्षातील ३६५ दिवस अखंडपणे हे कार्य सुरु असते. मिळणाºया मदतीतून ७० टक्के खर्च अन्नादानावर तर ३० टक्के खर्च इतक सेवाकार्यात केला जातो.
‘सेवेचा सत्कार होत नाही...’
दानशूर व्यक्ती मदत करीत असताना शहरातील एका दात्याकडे घरकाम करणाºया एका महिलेनेदेखील पुढे येत या अन्नदानासाठी एक महिन्याचे वेतन दिल्याचे या वेळी आवर्जून नमूद करण्यात आले. या बद्दल तिचा सत्कार करण्यासाठी तिला समितीच्यावतीने बोलविण्यात आले असता, त्या महिलेने ‘सेवेचा सत्कार होत नाही...’ असे उत्तर देऊन दातृत्वाची नवी व्याख्याच सर्वांसमोर ठेवली.
कपडे, ब्लँकेटच्या माध्यमातून मायेची उब
जिल्हा रुग्णालयात अचानक कोणी रुग्ण आला व त्याच्याकडे कपडे नसल्यास अथवा अपघातात कोणाचे कपडे फाटले असल्यास अशा रुग्णांना सेवालयाच्या माध्यमातून कपडेदेखील उपलब्ध करून दिले जातात. इतकेच नव्हे कपड्यांसोबतच ब्लँकेट, शालदेखील उपलब्ध करून दिले जातात.
रुग्ण साहित्य केंद्र
अपघात अथवा इतर कोणत्याही कारणाने रुग्ण अथंरुणावर पडून राहत असल्यास अथवा त्यास व्हील चेअर, कुबड्यांची गरज असल्यास अशा रुग्णांना हे साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम रुग्ण साहित्य केंद्राच्यावतीने केले जाते.
रुग्णमित्रांचा निराधारांना आधार
सेवालयाचेच अनेक पदाधिकारी रुग्णमित्र म्हणून येथे काम करीत असतात. रुग्णालयात कोणी बेवारस रुग्ण आल्यानंतर त्यांना केस पेपर काढण्यापासून तर रुग्णालयातून सुट्टी होईपर्यंतची मदत करण्याचे काम रुग्णमित्र करीत असतात. या सोबतच कोणी अनोळखी रुग्ण आल्यास त्याची ओळख पटवून त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे कार्यदेखील रुग्ण मित्र करीत असतात. या बाबतचे अनेक अनुभवदेखील या वेळी सांगण्यात आले.
किशोरी विकास उपक्रम
मुलींच्या विविध प्रश्नांसंदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठीदेखील सेवालयाच्यावतीने किशोरी विकास उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये मुली तसेच मातांना मार्गदर्शन केले जाते. आता शहरातील प्रत्येक झोपडपट्टीच्या भागासह ग्रामीण भागात मुली तसेच माता यांच्याशी संवाद साधून विविध गैरसमज, प्रश्नांबाबत जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
ग्राम आरोग्य रक्षक योजना
दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहचली नसल्याने अशा गावांमध्ये एका जणाची निवड करून तेथे किमान प्रथमोपचार तरी उपलब्ध करून देण्याचे काम ग्राम आरोग्य रक्षक योजनेच्या माध्यमातून १९९९ पासून सुरू आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यातील ४३ गावांमध्ये ही सेवा केली जात आहे.
या सोबतच जलपुनर्भरण, संस्कार केंद्र, जळीत रुग्णांची सेवा, मोठ्या अपघातावेळी मदत कार्य करण्याचे काम सेवालयाचे पदाधिकारी करीत असतात.

Web Title: Health care with fasting in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.