आरोग्य सेवेच्या व्रताने शस्त्रक्रियेचा ‘लाखा’चा टप्पा पार - डॉ. एन.एस. चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:25 AM2019-06-02T11:25:13+5:302019-06-02T11:25:24+5:30
कुटुंब नियोजनाच्या एक लाखावर शस्त्रक्रिया
जळगाव : तळागळातील व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचून त्यांना त्यांचे हक्काचे उपचार मिळालेच पाहिजे, या विचाराने आरोग्य सेवेचे व्रत घेऊन काम करीत राहिल्याने आपण कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा एक लाखाच्यावरचा टप्पा गाठू शकलो, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये एक लाखावर शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉ. चव्हाण यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सुरुवातीपासूनचा प्रवास सांगितला. प्रश्नोत्तराच्या स्वरुपात त्यांच्याशी झालेला हा संवाद....
प्रश्न - एवढ्या शस्त्रक्रिया करणे कसे शक्य झाले ?
उत्तर - ग्रामीण भागासह तळागळापर्यंत आरोग्य सेवा पोहचणे यासाठी आपला सुरुवातीपासूनच प्रयत्न आहे. त्यात आर्थिक कारणांमुळे अनेक जणांना खाजगी रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. त्यामुळे मी जेथे गेलो तेथील शासकीय रुग्णालयांमध्ये कुटुंब नियोजन असो अथवा सिझेरियन सारख्या सुविधा सुरू केल्या तर जेथे या सुविधा होत्या तेथे त्यात सुधारणा केली. त्यामुळे गरजूंना शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाली. त्यासाठी मी स्वत: शस्त्रक्रिया करू लागलो व ही संख्या वाढत गेली.
प्रश्न - शस्त्रक्रिया होऊ लागल्या, मात्र मुलींचा जन्मदर कसा आहे?
उत्तर - बीड जिल्ह्यात काम करीत असल्यापासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची संख्या वाढत गेली. मात्र या सोबतच मुलींचा जन्मदर वाढविण्यावरही भर राहिला. तेथे काम करण्यास सुरुवात केली त्या वेळी मुलींचा जन्मदर ७९५ (एक हजार मुलांमागे ७९५ मुली) होता, नंतर तो ९२५वर नेला. जळगावातील आलो त्या वेळी हा जन्मदर ८२५ होता आता तो ९२७ वर नेला आहे. त्यामुळे ‘बेटी बचाओ’ उपक्रमात सक्रीय सहभाग राहण्यासह जनजागृती केल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
प्रश्न - जळगावात मोठी उपलब्धी कोणती
उत्तर - आरोग्य सेवेच्या बाबतीत जळगाव जिल्हा सुरुवातीला राज्यात २६व्या स्थानावर होता. आता तो पहिल्या तीनमध्ये आणला आहे. या सोबत येथे जिल्हा रुग्णालय परिसरातील अतिक्रमण काढल्याने येथे महिला व बाल रुग्णालय मंजूर झाले असून त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल.
प्रश्न - लोकसंख्या वाढत असल्याने आरोग्य सेवेबाबत पुढील नियोजन काय आहे?
उत्तर - जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये चांगल्या सुविधा तर उपलब्ध केल्या जात आहे, त्या सोबतच आता जामनेर, मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालय १०० खाटांचे तर चोपडा उप जिल्हा रुग्णालय २०० खाटांचे करणे, रावेरला १०० खाटा उपलब्ध करणे व पहूर येथे ट्रामा सेंटर सुरु करण्याचे नियोजन आहे. सध्या जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांसाठी १०० कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातून जळगावातील महिला व बाल रुग्णालयासह जामनेर, सावदा, किनगाव येथे काम केले जाणार आहे.
जिल्ह्यात सर्व ठिकाणी सिझेरियनची सुविधा
जिल्ह्यातील उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे प्रसूती होत नव्हत्या. त्यामुळे त्याचा भार जिल्हा रुग्णालयावर येत असे. मात्र आता जिल्ह्यात या सर्व ठिकाणी सिझेरियनचीदेखील सोय केल्याने तेथे प्रसूती होऊ लागल्या आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला गावातच अथवा गावाजवळच सुविधा मिळाल्याने त्यांचेही हाल थांबले असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकारी ते शल्य चिकित्सक
बीड येथे २५ वर्षे आरोग्य सेवेचा डॉ. चव्हाण यांना अनुभव असून वैद्यकीय अधिकारी ते जिल्हा शल्य चिकित्सक दरम्यानच्या सर्व पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. तब्बल एक लाख कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्यांचा शासनातर्फे सत्कार करण्यात आला आहे. मराठवाड्यात प्लेगची साथ पसरली असताना या साथरोगावर मात करण्यासाठी तसेच किल्लारी येथे भूकंपग्रस्त भागात अनेक दिवस सेवा करीत त्यांनी साथरोगावर मात केली आहे.
आपले काम आपण करीत राहणे यावर भर आहे. सोबतच तळागळातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा मिळू शकेल त्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचा सदैव प्रयत्न आहे.
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.