जामनेरला कोरोना काळात जनतेला आधार ठरले आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 02:26 PM2020-06-12T14:26:44+5:302020-06-12T14:29:09+5:30
सध्या आरोग्य विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.
सय्यद लियाकत/मोहन सारस्वत
जामनेर, जि.जळगाव : सध्या आरोग्य विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. अधिकारी व कर्मचारी नियमित कामे ही तेवढ्याच काळजीपूर्वक करीत आहेत. २३ मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यापासून आतापर्यंत तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ५०० प्रसूती व ४० कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे कोरोना काळात सर्व वाहतूक बंद असल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरातील उपजिल्हा रुग्णालय हे जनतेला ‘आधार’ ठरले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सध्या कामात प्रचंड व्यस्त आहे. विविध उपाययोजना राबवत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य, पोलीस, महसूल, नपा. प्रशासन, शिक्षक ही सर्व यंत्रणा परिश्रम घेत आहे.
अशा परिस्थितीत तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयात दर आठवड्यात होणारे कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया व प्रसूती सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियमाचे पालन करून करण्यात येत आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल चांदा, डॉ.आर.के.पाटील, डॉ.जयश्री पाटील, डॉ.प्रशांत महाजन आदी कर्मचारी परिश्रम घेत आहे.
कोरोना काळात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय हे जनतेला आधार ठरले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ग्रामीण भागातील सेवा ह्या अविरत सुरू असल्यामुळे सर्वात अधिक प्रसूती ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झाल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी-८९
प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद-४६
प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपूर-२९
प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी-१६
प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी -१०
प्राथमिक आरोग्य केंद्र गारखेडा ७
प्राथमिक आरोग्य केंद्र बेटावद ५
उपजिल्हा रुग्णालय जामनेर २००
उपजिल्हा रुग्णालय जामनेर ४० सीजर
पहूर रुग्णालय १६
पहूर रुग्णालय १५ सीजर
उपजिल्हा रुग्णालय जामनेर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ४०
अशा एकूण जवळपास ५०० प्रसूती व ४० कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच गरोदर मातांची तपासणी व उपचारसुद्धा नियमित सुरू आहेत. त्याचप्रमाणे नियमित लसीकरण व बी.सी.जी.चे १२८८ डोस, पोलिओचे ११६९ डोस, पेंटा १२१८, एम.आर.१३७ डोस देऊन सुमारे ११६३ बालकांना पूर्ण संरक्षित करण्यात आले.