चाळीसगाव पालिकेचा आरोग्य विभागच ‘आजारी’, सर्वसाधारण सभेत सत्ताधा-यांसह विरोधकही आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:56 AM2019-09-14T11:56:46+5:302019-09-14T11:57:02+5:30
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्यासह एलईडी दिवे, न.पा.कर्मचारी आदी प्रश्नांवर वादळी चर्चा
चाळीसगाव, जि. जळगाव : शहरात रोगराई वाढली असून पावसाळ्यात होणा-या साथ आजारांनीही डोकेवर काढले आहे. अशा परिस्थितीत अस्वच्छतेला भिडणारा आरोग्य विभागच ‘आजारी’ असल्यासारखी स्थिती असल्याचा त्रागा सत्ताधा-यांसह विरोधकांनीही केला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्यासह एलईडी दिवे, न.पा.कर्मचारी आदी प्रश्नांवर वादळी चर्चा झाली.
नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, प्र. मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्यासह भाजपचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, शविआचे गटनेते राजीव देशमुख व नगरसेवक उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेत विरोधकांसोबत सत्ताधारी नगरसेवकांनी आरोग्य विभागातील कर्मचा-यांबद्दल तीव्र रोष व्यक्त केला. नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी नागरिकांच्या आरोग्याबाबत आरोग्य विभाग उदासिन असल्याचे सांगितले. पावसाळा असल्याने शहरात साथ रोगांचे प्रमाण वाढले असून नियमित स्वच्छता होत नसल्याची बाबही सभागृहात मांडली. अस्वच्छता कळीचा मुद्दा असल्याचे सदस्य विजया पवार, दीपक पाटील, सूर्यकांत ठाकूर यांनी सांगितले. आरोग्य विभागातील कर्मचा-यांना कामकाजाविषयी समज देण्यात यावी, अशी जोरदार मागणीही सदस्यांनी केली. एलईडी दिव्यांचाविषय देखील चांगलाच तापला.