आरोग्य विभागाच्या भरती प्रकियेच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:47+5:302021-06-23T04:12:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेसाठी मनुष्यबळ नसल्याने शिवाय ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करायची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेसाठी मनुष्यबळ नसल्याने शिवाय ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करायची असल्याने दोन निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून अखेर दुसऱ्या कर्मचाऱ्यांना पदभार देण्यात आला आहे. शिवाय या कर्मचाऱ्यांकडून काही माहितीही गोळा करून घेण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर आरोग्य विभागात अधिकारी थांबून होते.
राज्यस्तरावरून आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २०१९मध्ये जाहिरात दिल्यानुसार पदे भरण्यात येणार आहेत. मात्र, यात दिव्यांगांची पदेही एक टक्का वाढली आहे. त्यानुसार याबाबत येत्या २८ ते २९ जून रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, या सर्व बिंदूनामावली व कार्यालयीन प्रक्रिया मंगळवारी सुरू करण्यात आली होती. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे हे दिवसभर आरोग्य विभागात थांबून होते. दरम्यान, गेल्या आठवडाभरापूर्वी पदोन्नत्यांच्या विषयावरून निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यक उमेश सपकाळे व वरिष्ठ सहाय्यक नितीन वारुळे यांना मंगळवारी जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडून दुसऱ्या अन्य कर्मचाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे.