चाळीसगावात आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:50 PM2021-02-18T22:50:04+5:302021-02-18T22:50:37+5:30
गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : तालुक्यात गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने दररोज १५० ते २०० जणांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.
सद्य:स्थितीत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. चाळीसगाव तालुक्यातील दहिवद, खेडगाव, लोंढे, पातोंडा, रांजणगाव, शिरसगाव, तळेगाव, तरवाडे, उंबरखेड, वाघळी या दहा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य सेवक, सेविका, कर्मचारी यांच्यावतीने दैनंदिन घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे.
त्यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप आदी आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांची वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून त्यांचे स्वॅब घेतले जातात. त्यानंतर त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जात आहे. गृहभेटीत या कर्मचाऱ्यांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीही केली जात आहे. काही ठिकाणी अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांच्याकडून याबाबत मदत घेतली जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सतत मास्क घालणे आवश्यक आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. नाक, तोंड, डोळ्यांना वारंवार हात लावू नयेत. ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे आदी लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
आरोग्य विभागात ६५ पदे रिक्त
चाळीसगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकूण ६५ पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणा पांगळी झाली झाली आहे. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. त्यामुळे इतरांवर कामाचा ताण वाढला आहे.
रिक्त पदे अशी
आरोग्य सहायक २, आरोग्य सहायिका ९, आरोग्य सेवक ९, आरोग्य सेविका २३, औषध निर्माण अधिकारी ३,परिचर १९ अशी एकूण ६५ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.
चाळीसगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी टाळावे.
-डॉ. देवराम लांडे,
तालुका वैद्यकीय अधिकारी, चाळीसगाव.