आरोग्य यंत्रणा झाली सैरभैर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 12:41 PM2020-08-08T12:41:48+5:302020-08-08T12:42:05+5:30
यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा कळस : तीन घटनांनी जिल्ह्यात उडाली खळबळ
जळगाव : कोरोनाचा संसर्ग आता वाढू लागल्यानंतर आरोग्य यंत्रणाही सैरभैर झाली आहे. जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या घटनांनी कोरोना यंत्रणेतील बेजबाबदार आणि हलगर्जीपणा समोर आला आहे. डिस्चार्जची वेळ आली आणि रुग्णाचा झालेला मृत्यू, एका महिलेवर ती निगेटीव्ह असतानाही पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये केलेले उपचार आणि कोविड सेंटरला उपचार घेतल्यानंतरही शिक्षकाचा पुन्हा पॉझिटीव्ह आलेला रिपोर्ट या तीन घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील जामनेर, कुºहाड ता. पाचोरा आणि वरणगाव येथील एका शिक्षकाबाबत हे गंभीर प्रकार घडले आहेत.
जळगाव : कोविड रुग्णालयात दाखल जामनेर येथील मुख्याध्यापकाचा अहवाल निगेटीव्ह आला. रुग्णाला आता घरी नेता येइल, असा निरोप मुलाला पाठविण्यात आला. इकडे सकाळी साडेपाच वाजता रुग्णाने चहा घेतला आणि अवघ्या दोन तासातच त्यांच्या मृत्यूचा सांगावा आला. या प्रकाराने कोविड रुग्णालयाविषयी संशय वाढला आणि आधी मृत्यूचे कारण सांगा, असा आग्रह नातेवाईकांनी धरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
जामनेर रहिवासी व इंदिराबाई ललवाणी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रल्हाद वाघ (५७) यांचा १ आॅगस्टच्याआधी कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ त्यांना सुरूवातीला जामनेर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचार झाले. प्रकृती काहीशी खराब झाल्याने त्यांना १ आॅगस्टला जळगावातील इकरा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, त्यानंतर कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ते दाखल होते़
गुरुवारी साडे सात वाजेच्या सुमारास मृत्यूची बातमी आल्याने नातेवाईकांना धक्का बसला़ संबधित रुग्णाला अन्य कसलीच व्याधी नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे़ डॉक्टरांनी दुर्लक्ष केले़ व्यवस्थित मॉनिटरींग झाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला़ संबधित डॉक्टर्सवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली़
आॅक्सिजनची पातळी सामान्य
आॅक्सिजनची पातळी सामान्य होती़ बऱ्याच वेळा आम्ही मशिनकडे बघायचो तेव्हा डॉक्टर सांगायचे मशिन चुकू शकतात .त्यांच्याकडे नका बघू, तब्येत बघा़ सर्व काही सामान्य असताना अशा अचानक मृत्यू नेमका कशाने? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे़ दरम्यान, या मृत इसमावर नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
संबधित रुग्णाची प्रकृती गंभीर होती़ त्यांना सतत आॅक्सिजन पुरवठा करावा लागत होता. जरी त्यांचा अहवाल निगेटीव्ह असला तरी कोविडमुळे बºयाच रुग्णांच्या अन्य अवयवयांवर आघात झालेले असतात़ त्याचे नंतर गंभीर परिणाम होऊ शकतात़ कोरोनानंतर फुफ्फुस, हृदयावर परिणाम होत असतो.
- डॉ़ दत्तात्रय बिराजदार,
वैद्यकीय अधीक्षक,
१६ हजारांचे इंजेक्शन आणले बाहेरून
कोविड रुग्णालयात सर्व औषधोपचार मोफत असताना आम्हाला १६ हजार रुपयांचे इंजेक्शन्स हे बाहेरून एका खासगी रुग्णालयातून आणायला लावल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे़ हा नेमका प्रकार काय? याचीही चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे़ रेमडेसिवीरची तीन इंजेक्शन्स बाहेरून आणली असल्याचा या मुलांचा दावा आहे.
दहा दिवसानंतर लक्षणे नसलेल्या रुग्णांना चाचणीशिवाय घरी सोडण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत़ त्यामुळे संबधितांची प्रकृती बघून डॉक्टरांनी चाचणी न करता त्यांना सोडले असेल़ कोरोना अहवाल नंतर पॉझिटीव्ह येण्याच्या शक्यता आहेत़ मात्र, डॉक्टर प्रकृती बघून निर्णय घेतात़ लक्षणे असल्यास १४ दिवसानंतर पुन्हा नमुने घेऊन तपासणी केली जाते़
- डॉ़ यु़ बी़ तासखेडकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक
कुºहाड येथील कोरोना संशयित महिलेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कुºहाड ता़ पाचोरा येथील एका ५२ वर्षीय कोरोना संशयित महिलेचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला़ दरम्यान, डॉक्टरर्सनी नमुने घेण्यास उशिर केला, शिवाय दुर्लक्ष केले, त्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे़ संबधित महिला दोन दिवसांपासून कोविड रुग्णालयात दाखल होत्या़ त्यांना न्यूमोनियाची लागण झालेली होती़
पाचोरा येथे खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांची अॅन्टिजन टेस्ट करण्यात आली होती़
त्यात त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला होता़ मात्र, न्यूमोनिया असल्याने शिवाय त्यांना आॅक्सिजनची गरज लागत असल्याने त्यांना कोविड रुग्णालयात कक्ष दहामध्ये दाखल करण्यात आले होते़ शुक्रवारी त्यांचा सकाळी साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला़ अहवाल निगेटीव्ह असताना बाधितांच्या कक्षात का दाखल केले गेले? असा आरोप या महिलेच्या मुलाने केला आहे़