आरोग्य यंत्रणाच उठली जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2017 12:30 AM2017-01-09T00:30:43+5:302017-01-09T00:30:43+5:30
चार मुलीनंतर झालेल्या मुलाचा अंत : अर्भकाचे डोके गर्भाशयात असलेल्या अवस्थेत पहूर येथील महिला जिल्हा रुग्णालयात
जळगाव : प्रसूतीदरम्यान अर्भकाचे धड बाहेर आल्यानंतर पूर्ण प्रसूती न होता डोके गर्भाशयातच राहिल्याने तशाच अवस्थेत पहूरच्या महिलेला खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरअभावी ही वेळ आलेल्या या महिलेला वेळेवर रुग्णवाहिकाही न मिळाल्याने अखेर नवजात अर्भकाचा करुण अंत झाल्याची ह्रदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली.
जामनेर तालुक्यातील पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून येथील आरोग्यसेवा ठप्प होऊन उपचारही केले जात नाही.
अशातच 8 जानेवारी रोजी मेहराज गफ्फार तडवी (30) या गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करायचे होते, मात्र डॉक्टर नसल्याने तिला या रुग्णालयात दाखल करता आले नाही. त्यामुळे तिला पाळधी येथील आरोग्य उपकेंद्रात हलविण्यात आले.
तेथे आरोग्यसेविका ज्योती भंगाळे यांनी या महिलेची प्रसूतीची तयारी केली. मात्र प्रसूती दरम्यान अर्भकाचे धड बाहेर तर आले मात्र डोके गर्भाशयातच अडकून राहिले. प्रयत्न करूनही बाळ पूर्ण बाहेर येत नव्हते. त्यामुळे भंगाळे यांनी या महिलेला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.
चार मुलीनंतर मुलगा
या महिलेला पहिल्या चार मुली आहे. आता मुलाचा गर्भ असताना वेळेवर उपचार न मिळाल्याने या निष्पाप जीवाला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य यंत्रणेचा
निष्काळजीपणा पुन्हा चव्हाटय़ावर
जनतेसाठी विविध शासकीय योजना व आरोग्य विषयक उपाययोजना होत असल्या तरी प्रत्यक्षात आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ आहे, हे पुन्हा या घटनेवरुन सिद्ध झाले आहे.
राज्य मार्गावरील व मोठे गाव असलेल्या पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने या महिलेला इतरत्र हलवावे लागले.
त्यात वेळेवर एकही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जन्माला येण्यापूर्वीच अर्भकाला जीव गमवावा लागल्याने आरोग्य यंत्रणाच जीवावर उठल्याचा प्रत्यय या महिलेला आला.
पहूर येथे गेल्या अनेक दिवसापासून वैद्यकीय अधिका:याची नियुक्ती नसल्याने मोठीच अडचण झाली आहे.