रिक्षा चालवताना प्रकृती बिघडली, थांबवताच खाली पडून चालक ठार; उष्माघात की ह्रदयविकार
By विजय.सैतवाल | Published: March 24, 2024 06:05 PM2024-03-24T18:05:57+5:302024-03-24T18:06:08+5:30
रविवार, २४ मार्च रोजी जळगावचा पारा ४० अंशावर पोहचला. त्यामुळे उन्हाचे चांगलेच चटके जाणवत होते. शिंपी यांना भरदुपारी उष्माघाताचा फटका बसला की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
जळगाव : चालत्या रिक्षामध्ये त्रास होऊ लागल्याने ती रस्त्याच्या कडेला थांबवताच रिक्षातून खाली पडून संजय आधार शिंपी (५५, रा. अर्जुन नगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, २४ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर घडली. शिंपी यांचा मृत्यू नेमका उष्माघाताने की ह्रदयविकाराने झाला, हे शवविच्छेदनानंतर समजणार आहे.
अर्जुन नगरमधील रहिवासी असलेले संजय शिंपी हे रिक्षाचालक होते. रविवारी दुपारी ते बसस्थानकाकडून जिल्हा क्रीडा संकुलाकडे रिक्षा (क्र. एमएच १९, सीडब्ल्यू ३१६७) घेऊन जात असताना पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर त्यांना त्रास होऊ लागला. त्या मुळे त्यांनी रिक्षा थांबवली व काही क्षणातच ते खाली कोसळले. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनास्थळावरील परिचयातील व्यक्तीने शिंपी यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यावेळी कुटुंबीय व इतर नातेवाईक रुग्णालयात पोहचले.
पारा ४० अंशावर, उष्माघाताची शक्यता?
रविवार, २४ मार्च रोजी जळगावचा पारा ४० अंशावर पोहचला. त्यामुळे उन्हाचे चांगलेच चटके जाणवत होते. शिंपी यांना भरदुपारी उष्माघाताचा फटका बसला की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तसेच शिंपी यांना ह्रदयाचाही त्रास असल्याने त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला की काय, हे नेमके शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.
जेवण करून निघाले अन् काही वेळात मृत्यूची वार्ता आली
होळीचा सण असल्याने दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान शिंपी यांनी घरी जेवण केले व ते रिक्षा घेऊन बाहेर पडले होते. त्याच्या काही वेळातच त्यांच्या मृत्यूची वार्ता घरी पोहचली. ऐन होळी सणाच्या दिवशी घराचा आधार गेल्याने शिंपी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वर्षभरापूर्वीच शिंपी यांच्या भावाचे निधन झाले. त्यामुळे ते सारखे विचारातदेखील राहत होते. त्यामुळे त्यांची प्रकृती काहीसी नाजूकच होती, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
ज्या रिक्षावर उदरनिर्वाह त्याच रिक्षाने मृतदेह नेण्याची वेळ
शिंपी यांचा रिक्षावरच उदरनिर्वाह होता. ज्यावर उदरनिर्वाह चालायच्या त्याच रिक्षातून ते खाली पडले व नागरिकांनी या रिक्षामधूनच त्यांना रुग्णालयात नेले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.