‘भाग’ऐवजी ‘वाघ’ ऐकले अन् सायगावच्या यात्रेत झाली पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:11 PM2017-12-09T12:11:43+5:302017-12-09T12:14:27+5:30
चाळीसगाव वनक्षेत्रात हिस्त्र प्राण्याची दहशत कायम असल्याचा प्रत्यय
आॅनलाईन लोकमत
सायगाव, ता.चाळीसगाव, दि.९ : येथे यात्रेत घरगुती गॅसने पेट घेतल्यानंतर हिंदी भाषिक जोडप्याने भीतीने एक दुसºयाला तेथून ‘भाग’ अर्थात ‘पळ’ असे म्हटल्याने ते पळू लागले. ‘भाग’च्या ठिकाणी काही जण ‘वाघ’ असे समजले आणि यात्रेत धावपळ उडाली. नंतर वाघाची अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर धावपळ थांबली. या प्रकारामुळे यात्रेत काही वेळ भीतीचे वातावरणही निर्माण झाले होते.
येथे दत्त जयंतीनिमित्त यात्रा सुरू आहे. यात्रेमध्ये पाळणा, आणि खेळणीची मोठी दुकाने आहेत आणि त्या ठिकाणी घरगुती वापराच्या स्वयंपाकी गॅसने तुरळक पेट घेतला. तेथे हिंदी बोलणारे जोडपे होते. तेथे गॅसने पेट घेतला. यामुळे ते घाबरले आणि बाहेर पळत सुटले आणि त्यांनी ‘भाग’, ‘भाग’ असा आवाज दिला. शुक्रवारचा बाजार असल्याने संपूर्ण गिरणा परिसरातून भाविक दर्शनासाठी भाजीपाला घेण्यासाठी आले होते. आलेल्या यात्रेकरूंमध्ये ‘भाग’ ‘भाग’ असा आवाज आल्याने त्यांना वाटले की, वाघ आला, वाघ आला आणि संपूर्ण यात्रेमध्ये धावपळ सुरू झाली.
या धावपळीमुळे बरेच यात्रेकरू गिरणा नदीपात्रात पळाले आणि कोणी मंदिरात शिरले, कोणी मंदिराचे आतून दरवाजे बंद केले. त्यामुळे कोणालाच काहीही सूचत नव्हते. शेवटी शेवटी तरुणांनी जिकडे तिकडे प्रचार केला आणि गॅसने पेट घेतला आणि त्यांनी भाग भाग असा आवाज दिला आणि लोकांमध्ये वाघ वाघ असा गैरसमज झाला आणि सैरावैरा पळत सुटलेले लोक पुन्हा आपापल्या बाजाराला लागले.
शेवटी वाघाची किती दहशत आहे, हे मात्र सांगायची गरज नाही. शेवटी गॅस आणि भाग, वाघ, यामुळे संपूर्ण यात्रेमध्ये खसखस पिकली आणि जिकडे-तिकडे एकच चर्चा ऐकायला मिळाली. ती म्हणजे गॅस, भाग, वाघ, शब्दाशब्दांचा किती गैरअर्थ झाला. पण अजूनही ग्रामस्थांच्या मनातून वाघ जात नाही, एवढे मात्र नक्की.