‘बेलगंगा’ हरकतींवर सुरू झाली सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:19 AM2018-06-13T00:19:21+5:302018-06-13T00:19:21+5:30
कारखान्यावर आज होणार पूजन
चाळीसगाव (जि.जळगाव) : बेलगंगा साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया झाल्यानंतर एकूण पाच हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर मंगळवारी तहसीलदारांसमोर सुनावणी सुरू झाली आहे. बुधवारीही हे कामकाज सुरुच राहील, अशी माहिती तहसीलदार कैलास देवरे यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या ताब्यात असणाऱ्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया पूर्ण झाली. अंबाजी ग्रुपने हा कारखाना खरेदी केला आहे. यावर कामगारांसह राज्य उपायुक्त वस्तू व सेवा भवन जळगाव, बँक आॅफ बडोदा शाखा देवळी, बेलगंगा ग्रामीण प्रतिष्ठान अशा पाच हरकती घेतल्या गेल्या. हरकतींची तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, असा अर्ज अंबाजी ग्रुपचे मुख्य प्रवर्तक चित्रसेन पाटील यांनी जिल्हाधिकाºयांकडे यापूर्वीच केला आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता वादी आणि प्रतिवादी यांच्या उपस्थित सुनावणींना सुरुवात झाली. बुधवारीही दिवसभर सुनावणीचे कामकाज सुरु राहणार आहे.
बुधवारी सुनावणीचे कामकाज झाल्यानंतर पुन्हा १९ व २२ रोजीदेखील सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बुधवारी कारखाना स्थळावर सकाळी साडेदहा वाजता मिल सेक्शनची (रस प्रक्रिया यंत्र) विधीवत पूजा केली जाणार आहे. गेल्या तीन महिन्यापासून कारखाना परिसर स्वच्छता व यंत्रसामुग्रीची दुरुस्ती करण्यात येत आहे. आॅगस्ट मध्ये ट्रायल सिझन घेण्याच्या दृष्टीने कामकाज केले जात असल्याचे चित्रसेन पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.