नगरसेवक अपात्रतेप्रकरणी ९ रोजी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:20 AM2021-08-26T04:20:43+5:302021-08-26T04:20:43+5:30
जळगाव - घरकूल घोटाळाप्रकरणी दोषी ठरलेल्या पाच नगरसेवकांच्या अपात्रताप्रकरणी दाखल दाव्यात ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. नगरसेवक कैलास ...
जळगाव - घरकूल घोटाळाप्रकरणी दोषी ठरलेल्या पाच नगरसेवकांच्या अपात्रताप्रकरणी दाखल दाव्यात ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. नगरसेवक कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, लता भोईटे व दत्तात्रय कोळी यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. या पाचही नगरसेवकांना अपात्र करावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली आहे. यासंदर्भात बुधवारी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. नाईक यांच्यावतीने ॲड. सुधीर कुलकर्णी तर महापालिकेच्यावतीने ॲड. आनंद मुजुमदार तसेच नगरसेवकांच्या वतीने ॲड. प्रदीप कुलकर्णी कामकाज पाहत आहेत
क्षेत्रसभा घेण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करा
जळगाव - महापालिकेतील नगरसेवकांना क्षेत्रसभा घेण्यासंदर्भात कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. मात्र, राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी अद्यापही अधिसूचना काढून कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे क्षेत्रसभा लागू करण्यासंदर्भात आदेश जारी करून विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोकसंघर्ष मोर्चातर्फे अंदाज समितीला दिले निवेदन
जळगाव - जिल्ह्यात आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीला मंगळवारी लोकसंघर्ष मोर्चातर्फे विविध शासकीय विभागांनी केलेल्या कामांमधील अनियमितता व त्रुटीबाबत निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात खरेदी केलेली यंत्रसामग्री, मातृत्व अनुदानाचा लाभ, यावल तालुक्यातील आसराबारी येथील आठ वर्षाच्या बालकाचा कुपोषणाने झालेला मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम, वॉटर ग्रेसचे कचरा संकलनाचे ढिसाळ नियोजनाची चौकशी करावी, अशीही मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
कानळदा रस्त्याची दुरुस्ती करा
जळगाव - कानळदा रस्त्यालगत केसीपार्क ते शिवाजीनगर दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, यामुळे २२ गावांच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. याबाबत बुधवारी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बापू परदेशी, विनायक चव्हाण, चेतन कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.