यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या जात वैधतेबाबत १२ रोजी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 09:03 PM2018-11-05T21:03:20+5:302018-11-05T21:03:56+5:30
यावल येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या अपात्रतेविषयी दाखल असलेल्या याचिकेवर १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे.
यावल, जि.जळगाव : येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या अपात्रतेविषयी दाखल असलेल्या याचिकेवर १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कोळी यांनी मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे, या आशयाची याचिका येथील नगरसेवक अतुल पाटील यांनी ३१ आॅगस्ट रोजी दाखल केली होती.
नोंव्हेबर २०१६ मध्ये झालेल्या येथील पालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून सुरेखा कोळी ह्या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. निवडणूक अधिनियम कलम ९ (अ) नुसार राखीव जागेवरील निवडून आलेल्या उमेदवाराने निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत जातवैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची अट होती. त्यानंतर राज्य शासनाने हा कालावधी एक वर्ष केला असला तरी एक वर्षाच्या मुदतीतही कोळी यांनी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भातील मुख्याधिकाºयांकडून तपशीलवार अहवाल मागवला आहे. १२ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर काय निर्णय देतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे. गटनेत्यांचे व्हिप झुगारल्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात दोन नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अपात्र ठरविले आहे.