जळगावकरांच्या अंत:करणात सुरेशदादा जैन यांचे नाव अमृतासारखे - बाबा महाराज सातारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:48 PM2018-02-08T12:48:56+5:302018-02-08T12:51:53+5:30
सुरेशदादा जैन यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कीर्तन सोहळ््यात गौरवोद्गार
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. ८ - सुरेशदादा जैन यांचा अमृतमहोत्सव हा अमृतच आहे. माणसे येतात अन् जातात मात्र त्यांनी केलेले कार्य अमृत असते, ते कधीही संपत नाही. त्याप्रमाणे जळगावकरांच्या अंत:करणात सुरेशदादांचे नाव अमृतासारखे आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांनी आज काढले.
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एल. के. फाउंडेशनतर्फे बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान रोज सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० या वेळात शिवतीर्थ मैदानावर आयोजित केला आहे. त्यास बुधवारी संध्याकाळी सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, महापौर ललित कोल्हे, ज्येष्ठ नगरसेवक विजय कोल्हे, माजी महापौर सिंधूताई कोल्हे, ज्योती कोल्हे, मीनल कोल्हे आदी उपस्थित होते.
दादांना अमृताची भेट
प्रास्ताविक ललित कोल्हे यांनी केले. या वेळी ते म्हणाले की, सुरेशदादा जैन यांचे बोट धरून राजकारणात आलो. त्यामुळे त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना काय भेट द्यावी, असा विचार केला. ‘अमृताहुनी गोड नाव तुझे देवा’, असे मी ऐकले होते. त्यामुळे दादांना अमृत द्यावे असा विचार केला व या कीर्तन सोहळ््याचे आयोजन केल्याचे ललित कोल्हे यांनी सांगितले. सूत्रसंचालन शंभू पाटील यांनी केले.
दादांचे आणि माझे नाते अमृतासारखे
जळगावकरांच्या अंतकरणात सुरेशदादांचे नाव अमृतासारखे आहे, तशाच प्रकारचे त्यांचे व माझे नाते असल्याचे बाबा महाराज सातारकर म्हणाले. अनेक माणसे येतात जातात मात्र यात दादांचा आणि माझा केवळ नात्याचा संबंध नाही तर जिव्हाळ््याचा संबंध असल्याचे त्यांनी सांगून वाहत्या पाण्यासह विहिरीचे, नदीचे पाणी आटते, मात्र जिव्हाळ््याचे पाणी आटत नाही, असेही बाबा महाराज म्हणाले.
‘नाथ’ विषयावर कीर्तन सोहळा
बाबा महाराज सातारकर म्हणाले, खान्देशात दरवर्षी वेगवेगळ््या ठिकाणी माझे कीर्तन होत असते. त्यात वेगवेगळ््या विषयाची परंपरा असल्याचे सांगून त्यांनी ‘नाथ’ या विषयावर हा कीर्तन सोहळा होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार आज त्यांनी संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह वारकरी संप्रदायाच्या संतांच्या परंपरेची व त्यांच्या कार्याची गाथा आपल्या मधाळ वाणीतून जळगावकरांसमोर ठेवली.
सन्यास, ब्रह्मचर्य टाकून निर्माण झालेला वारकरी संप्रदाय
कोठेही निंदा करण्यापेक्षा जुळवून घ्यायला काय हरकत आहे, असा सवाल उपस्थित करीत बाबा महाराज सातारकर यांनी संसाराविषयी विश्लेषण केले. कोणालाही निंदा करू द्या मात्र भूक लागली की संसार आठवतोच. लग्न झाले नसले तरी बाईच्या हातूनच भीक्षा घ्यावी लागते, मग घरच्या बाईच्या हातचे काय वाईट आहे, असेही ते म्हणाले. सन्यास, ब्रह्मचर्य टाकून निर्माण झालेला वारकरी संप्रदाय असून संसारात राहून नाथ बाबांनी हा संप्रदाय उभा केल्याचे ते म्हणाले.
... मात्र धर्माचे रक्षण करत नाही
आपल्या धर्माचे रक्षण करा, असे सर्व जण म्हणतात मात्र तसे होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नावात काय आहे, त्यापेक्षा त्यातून काय प्रकट होते हे महत्त्वाचे आहे, असे सांगून त्यांनी कोण काय सांगतो, ते ऐका. कीर्तनाची चिकित्सा केली जाते, मात्र चिकित्सा न करता ते प्रेमाने ऐका, असा सल्ला त्यांनी दिला. कीर्तन करणाºयाचे नाव महत्त्वाचे नाही तर त्यातून काय प्रकट होते,हेपाहिलेजाते,असेसांगूनत्यांनीयामुळेचज्ञानोबा, तुकोबा हेआमचाश्वासअसल्याचेसांगितले.
तरुण महापौरांकडून कीर्तनाच्या आयोजनाबद्दल बाबामहाराज सातारकर यांनी कौतुक केले. सुरेशदादांना दादांना उदंड आयुष्य लाभो, ते शंभरी गाठो व तो साजरा करण्यासाठी मी येवो, अशा सदिच्छाही बाबा महाराज सातारकर यांनी दिल्या.
अडाण्यांचा संप्रदाय समजू नये
वारकरी संप्रदाय हा शेतकरी, अडाण्यांचा संप्रदाय आहे, असे कोणी समजू नये, असे बाबा महाराज सातारकर यांनी सांगत हा संप्रदाय असून कोणी निर्माण केलेला पंथ नसल्याचे स्पष्ट केले. ज्ञानोबांनी पाया रचला असे म्हटले जाते, मुळात ज्ञानच पाया असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. टाळ वाजविण्यास टाळ कुटणे म्हणत असाल तर यावरूनच तुमची मराठी समजून येते असे सांगत त्यांनी ही हीन प्रवृत्ती असल्याचे परखड मत मांडले.
‘जय जय रामकृष्ण’ ते ‘ज्ञानेश्वर माऊली तुकाराम’ पर्यंत सर्व तल्लीन
रामकृष्ण हरीने सुरुवात व ज्ञानोबा तुकारामने शेवट अशी कीर्तनाची परंपरा जपणाºया बाबा महाराज सातारकर यांनी ‘जय जय रामकृष्ण हरी....’ या कीर्तनाने सुरुवात केली. त्यानंतर ‘सुंदर ते ध्यान...’, ‘धन्यादी दिन संत दर्शनाचा...‘ हे कीर्तन सादर करून ‘ज्ञानेश्वर माऊली तुकाराम...’ या कीर्तनाने शेवट केला. सलग दोन तास या मधाळ कीर्तनात शहरवासीय तल्लीन झाले होते. कीर्तनाच्या वाद्यासोबत उपस्थितही टाळ््या वाजवून कीर्तनाचा आनंद घेत होते. शेवटी कोल्हे कुटुंबीयांच्याहस्ते पांडुरंगाची आरती झाली. या वेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.
पावलींनी वेधले लक्ष
बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनासोबत व्यासपीठावर टाळधारी तरुण व बालकीर्तनकार साथ देत होते. या वेळी त्यांच्या पावलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. येणाºया प्रत्येकाचे बुक्का लावून स्वागत करण्यात येत होते.
उपस्थितांनी व्हिडीओ कॉलद्वारे बाबांच्या कीर्तनाचे आप्तस्वकीयांना दर्शन घडविले.