हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
By विलास बारी | Updated: May 7, 2024 23:34 IST2024-05-07T23:33:12+5:302024-05-07T23:34:01+5:30
रामदेववाडीजवळील घटना, संतप्त जमावाची पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ मंगळवारी दि. ७ मे रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आईसह दोघे मुले ठार झाले. या अपघातात मयत महिलेचा १२ वर्षीय भाचा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
वच्छला उर्फ राणी सरदार चव्हाण (वय ३०), मुलगा सोमेश सरदार चव्हाण (वय २), सोहम सरदार चव्हाण (वय ७, सर्व रा.शिरसोली, ता. जळगाव) असे मयतांचे नावे आहेत. मयत महिला वच्छला चव्हाण या रामदेववाडी येथे आशा वर्कर म्हणून नियुक्तीला होत्या. यात त्यांचा भाचा लक्ष्मण भास्कर राठोड (वय- १२) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. यावेळी घटनास्थळी जमावाने पोलिसावर व वाहनांवर दगडफेक केली. यावेळी घटनेत दोन पोलिसांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.