रावेरला अडीच हजार मूर्तींचे संकलन करून गणरायाला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 12:43 PM2020-09-02T12:43:37+5:302020-09-02T12:46:02+5:30
रावेर : शहरात न.पा.ने उभारलेल्या नऊ मूर्ती संकलन केंद्रांवर तथा अंबिका व्यायामशाळा, छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा व युवा शक्ती ...
रावेर : शहरात न.पा.ने उभारलेल्या नऊ मूर्ती संकलन केंद्रांवर तथा अंबिका व्यायामशाळा, छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा व युवा शक्ती फाऊंडेशनच्या फिरत्या गणेश रथात शहरवासीयांनी विघ्नहर्त्या श्री गणरायाची मूर्ती समर्पित करून सोमवारी भावपूर्ण निरोप दिला. शहरवासीयांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे न.पा.ने पाच मिनीट्रक व छोट्या मालवाहू गाड्यांमधून सुमारे अडीच हजार श्रींच्या मूर्तींची अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या हस्ते महाआरती करून नांदूपिंप्रीच्या तापी नदी पुलावरून विधीवत विसर्जन करण्यात आले.
शहरातील श्री रामस्वामी मठातील मानाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विघ्नहर्त्या श्री गणरायाची मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, नंदकिशोर दलाल आदी कार्यकर्त्यांनी पूजन व आरती करून चार ते पाच कार्यकर्त्यांनी श्री गणरायाला पालखीत विराजमान करून "गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या गजरात श्री नागझिरी कुंडावर नेली. नागझिरी कुंडावर मंगलमूर्तीची आरती करून दुपारी दीडला मानाच्या बाप्पाचे जड अंतःकरणाने विसर्जन करण्यात आले.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व न.पा. मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शहरवासीयांनी आपापल्या परिसरात असलेल्या अष्टविनायक नगरातील श्री साईबाबा मंदिर, सावदा रोडवरील अग्सेन भवन, तिरुपती नगरमधील रोकडा हनुमान मंदिर, श्री स्वामी विवेकानंद चौकातील थड्याचा मारूती मंदिर, श्री शिवाजी चौकातील श्री संत तुकाराम महाराज मंदिर, न.पा.च्या पॉवर हाऊसमध्ये असलेल्या मूर्ती संकलन केंद्रांवर बाप्पा मोरयाला भावपूर्ण निरोप देत समर्पित केले.
दरम्यान, अंबिका व्यायामशाळा, छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा व युवा शक्ती फाऊंडेशनच्या फिरत्या श्री गणेश विसर्जन रथावरही भाविकांनी आपल्या घरातील श्रींच्या मूर्ती समर्पित करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरभरून प्रतिसाद दिला.
दरम्यान, न.पा.ने पुष्पवेलींनी सुशोभित केलेल्या पाच मिनीट्रक व दोन छोट्या मालवाहू गाड्यांना सुशोभित केलेल्या रथांद्वारे शहरातील नऊ संकलन केंद्रांवरून अडीच हजार श्रीं विघ्नहर्त्या गणनायकाचे मूर्तींचे संकलन करून आठवडे बाजार परिसरात स्थानापन्न करण्यात आले.
त्याठिकाणी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या उपस्थितीत अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या हस्ते श्रींचे पूजन व महाआरती करण्यात आली.
दरम्यान, गणेश मूर्तीचे रथ न.पा.ने तापी नदीवरील नांदूपिंप्री पुलावर नेवून पुन्हा विधीवत पूजन करून विघ्नहर्त्या श्री गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. दरम्यान, शहरातील खासगी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार-पाच कार्यकर्त्याच्या उपस्थितीत मंगरूळ धरण, आभोडा धरण, नांदूपिंप्री, भोकरी नदीवरील साठवण बंधार्यात विघ्नहर्त्या श्री गणरायाचे विसर्जन करून भावपूर्ण निरोप दिला.
दरम्यान, शहरातील संवेदनशील भागात राज्य राखीव पोलीस दल, धडक पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक, रावेर पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या जवानांनी शहर व परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त राखला.
शहरातील एक क्विंटल निर्माल्य न.पा.च्या परसबागेतील कंपोस्ट खताच्या खड्ड्यात
दरम्यान, शहरातील गणपती संकलन केंद्र व फिरत्या पथकांद्वारे सुमारे एक क्विंटल निर्माल्य संकलन करून न.पा.च्या पॉवर हाऊसमध्ये परसबागेतील कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकण्यात आले. निर्माल्याची धार्मिक भावना पाहता घनकचरा प्रकल्पात न टाकता परसबागेतील कंपोस्ट खतासाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.