रावेर तालुक्यात २४२ गणेश मंडळांकडून गणरायाला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:20+5:302021-09-21T04:18:20+5:30
रावेर : शहर व परिसरातील ५४ गणेश मंडळांनी, तसेच सावदा पोलीस स्टेशनंतर्गत ९६, तर निंभोरा पोलीस ठाण्यांतर्गत ९२, अशा ...
रावेर : शहर व परिसरातील ५४ गणेश मंडळांनी, तसेच सावदा पोलीस स्टेशनंतर्गत ९६, तर निंभोरा पोलीस ठाण्यांतर्गत ९२, अशा २४२ गणेश मंडळांकडून श्री गणरायाला कोरोनाचे निर्बंध पाळून मिरवणुका वा गाजावाजा न करता भावभक्तीने ‘पुढच्या वर्षी लवकर या’ची आर्त आळवणी करीत निरोप दिला.
रावेर शहरातील १३० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या श्री रामास्वामी मठातील मानाचा गणपती असलेल्या रावेर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते आरती करून पालखीत विराजमान करून श्री पाराच्या गणपती मंदिरात आणण्यात आले. याठिकाणी महाआरती करून पुन्हा श्रींची मूर्ती पालखीतून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात नागझिरी कुंडावर आणण्यात आली. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते आरती करून बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नंदकिशोर दलाल, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, संतोष पाटील, ई. जे. महाजन, सुरेश शिंदे, भाऊलाल शिंदे, प्रमोद महाजन, काशीनाथ महाजन, नगरसेवक ॲड. सूरज चौधरी, अंबिका व्यायामशाळेचे भास्कर पहेलवान आदी उपस्थित होते.
दरम्यान, नपाने शहरात ठेवलेल्या आठ मूर्ती संकलन केंद्रांमधून एक ते दीड हजार गणेश मंडळांसह घराघरातील गणपती बाप्पांचे संकलन करून नांदूपिंप्री येथील पुलावरून तापी नदीपात्रात श्री विघ्नहर्ता मंगलमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. काही गणेशभक्तांनी स्वतः मोटारसायकलवर वा सामूहिकरीत्या वाहनव्यवस्था करून श्रीक्षेत्र ओंकारेश्वरनजीक तामसवाडी येथे, मंगरूळ धरणात, अजनाड येथील तापी पात्रात, आभोडा धरण आदी ठिकाणी विसर्जन केले.
रावेर येथील मानाच्या गणपतीचे नागझिरी कुंडात विसर्जन करताना. (छाया : किरण चौधरी)