महाविकास आघाडीत मने जुळली नव्हती..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 05:23 PM2019-11-23T17:23:26+5:302019-11-23T17:26:00+5:30
- एकनाथराव खडसे, माजी मंत्री
महाविकास आघाडीत मने जुळली नव्हती..
महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिले होते व सर्वसामान्यांची इच्छा देखील महायुतीचे सरकार यावे हीच होती.दुर्दैवाने सेनेने माघार घेतल्याने समीकरण बदलले. युतीचे सरकार यावे आणि स्थिर सरकार यावे अशी आपली अपेक्षा आहे. मात्र मधल्या कालखंडात सेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा विभिन्न विचारांच्या तडजोडी सुरू झाल्या. त्यामुळे हे सरकार टीकेल की नाही ही शंकाच होती.हे स्थिर सरकार बनवण्याच्या दृष्टिकोनातून उचललेले पाऊल असून राजकारणातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. स्थिर सरकार येईल व दिलेली वचने देखील पूर्ण होतील. यासाठी मात्र वाट बघावी लागेल. शिवसेनेने स्वत:हून ओढवून घेतलेली ही परिस्थिती असून, महा विकास आघाडी करताना मने जोडलेली नाहीत.केवळ भाजपाचे सरकार नको म्हणून सर्वांनी एकत्र येऊन कोणालाही विश्वासात न घेता उचललेले हे पाऊल आहे.अजित पवार यांनी हे पाऊल उचलले याच्या मागील अर्थ हाच असावा की मने जुळली नव्हती. मनाने, तत्वाने व विचाराने एकत्र न आल्याने सेना काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार बनू शकले नाही. तत्व बाजूला ठेवून अशा गोष्टी घडत असतील तर राजकारणातील हे अनाकलनीय असे दुर्दैव आहे, अशी भूमिका माजी आमदार, माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली.