जळगाव जिल्ह्यात आगामी चार दिवस अतीवृष्टीचा इशारा; जिल्ह्यात यलो अलर्ट
By Ajay.patil | Published: September 13, 2023 06:57 PM2023-09-13T18:57:06+5:302023-09-13T18:57:16+5:30
३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज
जळगाव - जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा आगामी चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. जळगाव जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यात देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आगामी चार दिवसांसाठी जिल्ह्यात यलो अलर्ट देखील हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्रसोबत वादळी क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र ओडीशा, विदर्भमार्गे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. गुरुवारी मध्यप्रदेश व तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये या वादळी क्षेत्राचा मुख्य भाग राहणार असून, गुरुवारी दुपारनंतर जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतीवृष्टी होऊ शकते. यासह जळगाव जिल्ह्यात ३० ते ४० किमी वेगाने देखील वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
आगामी पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज
दिनांक - हवामानाची स्थिती
१४ सप्टेंबर - जिल्ह्यातील एक-दोन तालुक्यात अतिवृष्टीची शक्यता, ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार
१५ सप्टेंबर- ठराविक भागात मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता
१६ सप्टेंबर - सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर अतीमुळसळधार पावसाची शक्यता
१७ सप्टेंबर - वादळी पावसासह, वीजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
१८ सप्टेंबर - काही भागात मध्यम ते काही भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.