शहरात बरसल्या दमदार 'जलधारा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:32+5:302021-07-16T04:13:32+5:30
जळगाव : दिवसभराच्या पावसाच्या लपंडावानंतर सायंकाळी सहा वाजेनंतर अचानक आलेल्या जोरदार पावसाने शहरातील वातावरण थंडगार केले. तर या दमदार ...
जळगाव : दिवसभराच्या पावसाच्या लपंडावानंतर सायंकाळी सहा वाजेनंतर अचानक आलेल्या जोरदार पावसाने शहरातील वातावरण थंडगार केले. तर या दमदार पावसाने जळगावातील रस्ते जलमय झाले होते.
पावसाळ्यास सुरुवात झाली असली, तरी अद्याप जळगावात समाधानकारक पाऊस झालेला नाही. एक ते दोन दिवसापूर्वी दमदार पावसाने हजेरी लावून जळगावकरांना दिलासा दिला होता. मात्र, त्यानंतर सुध्दा प्रचंड उकाड्यात वाढ झालेली पहायला मिळाली. परंतु, गुरूवारी सकाळी आणि त्यानंतर सायंकाळी जोरदार पावसाच्या आगमनाने जळगावकर सुखावले असून, बळीराजाला शेतीकामासाठी याचा फायदा होण्याचे बोलले जात आहे.
सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी
सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी दिसल्याने पावसाचे वातावरण झाले होते. दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास शहरातील काही भागांमध्ये जलधारा बरसल्या. मात्र, अवघ्या काही मिनिटातच हा पाऊस थांबला. त्यानंतर लख्ख ऊनही पडले होते, त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवू लागला.
सायंकाळी पुन्हा हजेरी
दुपारी आलेल्या सरींनंतर लख्ख ऊन पडले होते. सांयकाळी सहा वाजेनंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. एक ते दीड तास चालेल्या या पावसामुळे संपूर्ण रस्ते जलमय झाले होते. शहरातील रस्त्याेवर पाणी साचले होते. रस्त्यावर साचलेल्या या पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची तारांबळ उडत होती.