जिल्ह्यात दमदार पावसाने नदी- नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:26 PM2019-09-14T22:26:03+5:302019-09-14T22:26:08+5:30

उघडीपची गरज : धरण आणि बंधाऱ्यांना लाभ : मात्र पिके सडण्याची भिती

 Heavy rains flood the river- drains | जिल्ह्यात दमदार पावसाने नदी- नाल्यांना पूर

जिल्ह्यात दमदार पावसाने नदी- नाल्यांना पूर

Next



जळगाव : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी व नाल्यांंना पूर आले. यामुळे काही लहान धरण व बंधारे हे भरल्याने समाधान व्यक्त होत आहे तर सूर्यदर्शन कमी होत असल्याने शेतांमध्ये जास्त ओल निर्माण होवून पिके सडण्याची भिती व्यक्त होवू लागल्याने उघडीपची वाट पाहिली जात आहे.
पारोळा तालुक्यातील
सर्व प्रकल्प पाण्याने फुल्ल
पारोळा तालुक्यातील मुख्य बोरी प्रकल्प हा १०० टक्के भरला असून शनिवारी ३ गेट उघडविण्यात आले आहेत. या धरणातून ६६० क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच तालुक्यातील खोलसर धरण, शिरसमनी, लोणी बुद्रूक, एमआय टँक, सावरखेडा धरण, म्हसवे धरण ही धरणे फुल्ल झाली आहेत. भोकरबारी, कंकराज व पिंपळकोठा ही धरणे ५० टक्क्यांपर्यंत पोहचली आहेत.
पारोळ्याचा पाणी पुरवठा होणार ६ दिवसा आड
सद्य:स्थितीत पारोळा शहराला ८ दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. बोरी धरण पूर्ण भरले आहे. त्यामुळे शहराला २० ते २२ तारखेपासून ६ दिवसाआड पुरवठा करणार आहे. यापुढे आणखी नियोजन करून ४ ते ५ दिवसाआड करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

नांदेड येथे तापीला पूर
नांदेडता. धरणगाव परिससरात गेल्या काही दिवसांपासुन पाऊस सुरूच आहे.केव्हा थोडी उघडीप तर केव्हा सततची रीपरीप आहे.१४ रोजीही सायंकाळी चांगलाच पाऊस सुरू होता.जमीनीची तहान पुर्ण झालेली असल्यामुळे आता पिकांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे . पाऊस असाच सुरूच राहीला तर बुरशीजन्य व मर रोगाच्या प्रादूर्भावामुळे खरीपाची पिके हातची जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे आता पुन्हा तापी नदीच्या पाण्यात वाढ होवुन नदीला मोठा पुर आला आहे.
अमळनेरात पावसाने
शंभरी ओलांडली
अमळनेर तालुक्यात पावसाने सरासरी १०० टक्क्यांची मर्यादा पार केली. शेतकऱ्यांमध्ये आंनद असला तरी अति पाण्यामुळे पिके सडून कामातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आता प्रखर उन्हाची गरज भासू लागली आहे. सतत ५ वर्षांपासून अवर्षण प्रवणग्रस्त तालुका दुष्काळात होता. सरासरी ५८२ मिमी पाऊस अपेक्षित असताना सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने सुमारे ७८ गावांमध्ये टंचाई जाणवत होती. पाच वषार्नंतर १४ सप्टेंबरपर्यंत ५९५ मिमी पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. नदी, नाले, शेततळे पूर्ण भरले असून बोअरवेलचीही पातळी वाढली आहे. मात्र आता उघडीप हवी आहे.
मातीच्या धाब्याच्या
घरांना गळती
चोपडा तालुक्यात भिज पावसामुळे मूग,उडीद,आदी. पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात असून, सततच्या भिज पावसामुळे मातीच्या धाब्याच्या घरांना गळती लागली आहे. यामुळे अशा घरात रहाणे ग्रामस्थांना धोक्याचे वाटू लागले आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र भिज पाऊस सुरू आहे. त्यामुळे कापूस पिकालाही फवारणीची दिली जात नसल्याने कापूस पिकावर मावा,तुडतूडे व किडंींचा प्रादुर्भाव झाला आहे. एकंदरीत, सततचा भिज पाऊस हा नुकसानीचा ठरत असून, शेतकरी उघडीप होण्याची वाट पाहत आहेत.
पाचोरा तालुकञयात सर्वच प्रकल्प भरले
पाचोरा तालुक्यात १०० टक्के पाऊस पडला असून सर्वच प्रकल्प व तलाव भरले आहेत.बहुळा खडकडेवळा प्रकल्प ९० टक्क़े पेक्षा जास्त भरला असून नद्यानाल्याना पूर आले आहेत. हिवरा नदीला पूर आल्याने पाचोरा -जळगाव महामार्गावरील पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरता बांधलेला पूल वाहून गेल्याने वाहतुकीस खोळंबा झाला होता. तर भडगाव पाचोरा महामार्गावरील पुलाचे काम सुरू असल्याने तेथील कच्चा पूल देखील वाहून गेल्याने वाहतुकीस ब्रेक लागला होता.
यामुळे प्रवासी वाहतुकीस खोळंबा होत असल्याने प्रवाश्यांचे हाल होत आहेत.कृष्णापुरी मित्रमंडळ व स्वयंसेवी संस्थेतर्फे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निवारा देऊन भोजनाची व्यवस्था केली जात असल्याने मित्रमंडळचे कौतुक होत आहे.
प्रशासनातर्फे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देऊन सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
अंजनी धरणात ८७ टक्के जलसाठा
अंजनी धरणाचे शुक्रवारी रात्री साडे सात वाजेपासुन अंशत: उघडण्यात आलेले दोन गेट शनिवारी पहाटे पाच वाजता बंद करण्यात आले.सद्य स्थितीत अंजनी धरण ८७ टक्के भरले आहे.यापेक्षा अधिक साठा केला असता हनमंत खेडे ,मजरे व सोनबर्डी गावाला धोका निर्माण होतो.विशेष हे कि अंजनी धरणाच्या मुख्य कालव्यांचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे.असे असतांना गेल्या पाच वर्षांपासुन लाभ क्षेत्रात सिंचनाचा लाभ झालेला नसून उपाययोजनेची मागणी होत आहे.
गिरणा धरण पूर्ण भरल्यावर विसर्ग होणार
नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भरपूर प्रमाणात पाऊस होत असून शनिवारी सायंकाळ पर्यंत गिरणा धरण ९४ टक्के भरले होते.
येत्या दोन दिवसात धरण १०० टक्के भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग होईल असेही त्यांनी सांगितले. गिरणा धरण १०० टक्के भरत असल्याने गिरणा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

 

 

Web Title:  Heavy rains flood the river- drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.