दमदार पावसाने सातपुडा बहरला, पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:53 PM2019-11-04T12:53:32+5:302019-11-04T12:55:28+5:30
निसर्ग सौंदर्याने नटला : अनेर पासून पासून पालपर्यंतच्या पायथ्यालगत सर्वच धबधबे, झरे वाहू लागले
अजय पाटील ।
जळगाव : यंदा जिल्ह्यासह राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे एकीकडे शेतकरी चिंतेत सापडला आहे. मात्र, दुसरीकडे या पावसामुळे जिल्ह्यालगत असलेला सातपुडा सौंदर्याने बहरला आहे. त्यामुळे सातपुड्याचा पायथ्याशी असलेल्या पर्यटन व धार्मिक स्थळांवर पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. कधी नव्हे यंदा अनेर डॅमपासून ते पाल अभयारण्यपर्यंतच्या सर्वच पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होत आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरी पावसापेक्षा तब्बल ४० टक्के जादाची सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळ-जवळ सर्वच मोठे, मध्यम व लहान प्रकल्प ओव्हरफ्लो होवून वाहत आहेत.
सर्वच प्रमुख नद्यांना दिवाळी संपल्यावरही मोठमोठे पूर येत आहेत. अशा परिस्थितीत केवळ पावसाळ्याचा दोन महिन्यांपर्यंत निसर्ग सौंदर्याने नटलेला सातपुडा पर्वत यंदा नोव्हेंबर महिन्यातच बहरलेला दिसून येत आहे. सातपुड्यातील झरे, धबधबे या महिन्यातही बरसत असल्याने यंदाची दिवाळी अनेक पर्यटकांनी सातपुड्याचा कुशितच भटकंती करत साजरा केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अनेर धरण
अनेर धरण हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात येते. चोपडा तालुक्यातील गलंगीपासून १२ किमी सातपुड्याचा पायथ्याशी असलेल्या अनेर नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. या ठिकाणी विदेशी पक्ष्यांचीही मोठ्या प्रमाणात संख्या असते.
त्यामुळे पक्षीमित्रांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच जिल्ह्यात अनेर नदीमधील मासे देखील प्रसिध्द आहेत.
अनेक पर्यटक या ठिकाणी केवळ मासे खाण्यासाठी येतात. तसेच यंदाच्या पावसामुळे धरण भरले असून, नदी देखील वाहत आहे. त्यामुळे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावत आहे.
‘चिंचपाणी’ ठरतेय
जिल्ह्याचे न्यूझीलंड
''चोपडा तालुक्यातील धानोरापासून अवघ्या १० किमी अंतरावर सातपुड्याचा दोन टेकड्यांमधोमध तयार करण्यात आलेल्या ‘चिंचपाणी’ पाझरतलावाचे आकर्षण यंदा पर्यटकांना जबरदस्त खुणावत आहे. स्वच्छ व निरभ्र आकाशात या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य अधिकच फुलून दिसून येत आहे. जिल्ह्याचे ‘न्यूझीलंड’ म्हणून देखील हे ठिकाण प्रसिध्द होत असून जंगलातून येणाऱ्या झऱ्यांमध्येही आंघोळ करण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत. यासह चोपडा तालुक्यातील गुळ नदीवरील मध्यम प्रकल्पाच्या ठिकाणीही पर्यटकांची गर्दी होत आहे.''
पाल व मनुदेवीतही पर्यटकांचा ओघ सुरुच
पाल अभयारण्य हे याआधी देखील जिल्हावासियांना परिचीत आहे. मात्र, यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे पाल अभयारण्याचा परिसर देखील उजळून निघाला आहे.यासह मनुदेवी येथील धबधबा आॅक्टोबरमहिन्यातच बंद होतो. मात्र, यंदा नोव्हेंबर महिन्यात देखील हा धबधबा सुरु आहे. तसेच या ठिकाणचा तलाव देखील भरल्याने पर्यटकांची गर्दी होत आहे.
भुशी डॅमचा आनंद यावलमधील निंबादेवी डॅमवर
पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक पर्यटक लोणावळा नजीकच्या भुशी डॅमवर आनंद लुटायला जातात. मात्र, ह्याच भुशी डॅमचा तोडीस-तोड निसर्ग यावल तालुक्यातील सातपुड्याचा पायथ्याशी असलेल्या निंबादेवी डॅमवर देखील पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे. या ठिकाणी पर्यटकांची अक्षरश जत्रा भरलेली पहायला मिळत आहे. किनगावपासून अवघ्या १३ किमीवर हे ठिकाण आहे. तसेच निंबादेवीच्या बाजुलाच वाघझिरा डॅम हे दोन्ही स्पॉट एकाच दिवसात आपल्याला करता येवू शकतात.
दिवाळी गेली पर्यटनात...
दिवाळीच्या निमित्ताने बाहेर गावाला नोकरीनिमित्त गेलेले अनेकजण घरी येतात. यंदा दिवाळीतही पाऊस सुरु असल्याने अनेक ांना दिवाळी साजरा करताच आली नाही. मात्र, या पावसामुळष कधी नव्हे यंदा अधिकच बहरलेल्या सातपुडा पर्वतातील निसर्गस्थळे पाहण्याजोगी झाली आहे. त्यामुळे अनेकांनी यंदाची दिवाळी सातपुड्याचा कुशीतच साजरी केली.