वादळी पावसामुळे दादरसह केळीच्या बागांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:16 AM2021-03-25T04:16:33+5:302021-03-25T04:16:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीदेखील जळगाव शहरासह तालुक्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीदेखील जळगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे केळीलादेखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळात जिल्ह्यातील सुमारे सात हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. मंगळवारी झालेल्या वादळामुळे नुकसानीची आकडेवारी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
जागतिक हवामान बदलामुळे यंदा प्रत्येक महिन्यात अवकाळी व वादळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. १९ मार्चपासून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर, चोपडा व जळगाव तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव शहर व परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाचा वेग जरी कमी असला तरी मात्र वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने शहर परिसरातील ग्रामीण भागामध्ये केळीचे मोठे नुकसान झाले. यासह आव्हाने, खेडी, वडनगरी ज्या भागातील दाद देखील पूर्णपणे आडवी झाली आहे, तर ज्या शेतकऱ्यांचा अद्यापही गहू काढण्यात आलेला नाही असा गहू पावसामुळे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. अशा परिस्थितीत पुन्हा मंगळवारी झालेल्या पावसामुळे नुकसानीची आकडेवारी वाढली आहे. आव्हाने, वडनगरी व कानडदा परिसरातील केळीच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
तब्बल बारा तास वीज पुरवठा खंडित
मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर हे वादळ कायम होतं, मात्र रात्री अकरा वाजेनंतर पाऊस व वादळानेदेखील विश्रांती घेतली. तासाभराच्या वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तसेच विद्युत तारादेखील तुटल्या असल्याने जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रभर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. बुधवारी सकाळीदेखील विद्युत खांब व विद्युत तारा जोडण्याचे काम सुरू असल्याने वीज पुरवठा बंद होता.
दादरच्या उत्पादनात येणार घट
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या वादळी पावसामुळे रबी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये गहू व हरभरा काढला गेल्यामुळे हे नुकसान टळले असले तरी, दादरचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे यंदा दादरच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सुमारे बावीस हजार हेक्टरवर दादरची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी २ हजार हेक्टरवरील दादरला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.