जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:07+5:302021-05-29T04:14:07+5:30
जळगाव : जिल्ह्यात रावेर व मुक्ताईनगर या दोन तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने केळी बागा अक्षरश: झोपल्या ...
जळगाव : जिल्ह्यात रावेर व मुक्ताईनगर या दोन तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने केळी बागा अक्षरश: झोपल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शुक्रवारी चोपडा आणि यावलच्या काही भागाला वादळी पावसाने झोडपून काढले. चाळीसगाव येथेही शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावल तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे दहिगाव, सौखेडा, कोरपावली परिसरात झाडे पडली. दहिगाव, कोरपावली येथील काही घरांचे पत्रे उडाले. काही गावातील वीजपुरवठा खंडित झाला. चाळीसगाव तालुक्यात विशेषत: आडगाव व देवळी परिसरात २८ मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपले. वादळ व पावसाचा जोर इतका प्रचंड
होता की, अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली, तर लिंबू, डाळिंब, शेवग्याची झाडेही मुळासकट कोसळली. वीटभट्टी आणि पशुधनाचेही नुकसान झाले आहे.
देवळी येथे शुक्रवारी विजेची तार पडल्याने बैल जागीच ठार झाला. याच गावातील दादाभाई फकिरा पिंजारी यांच्या पत्र्याच्या घरावरदेखील मेन तार पडला. पण यात मोठा अनर्थ टळला. यात कुटुंबीय बचावले. आडगाव परिसरात वादळामुळे शेतातील घराचे पत्रे उडाल्याने शेतमजूर कुटुंब उघड्यावर आ आहेत.
चौकट
मेंढोळदे ता. मुक्ताईनगर येथे वादळामुळे १८० कुटुंबे उघड्यावर आली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांची जेवणाची व्यवस्था, घर दुरुस्तीसाठी स्वखर्चातून १५ मिस्तरी व मजूर यांनाही बोलावून घेतले व लागलीच कामाला सुरुवात केली. दरम्यान, खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
चाळीसगावला पंचनामे सुरू
चाळीसगाव तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने आडगाव व देवळी येथे नुकसान झाले आहे. या ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत, असे नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांनी सांगितले.