धरणगाव तालुक्यात अतिवृष्टी, पाळधी महसुल मंडळात एकाच रात्री तब्बल १८२ मिमी पाऊस
By Ajay.patil | Published: September 24, 2023 07:02 PM2023-09-24T19:02:21+5:302023-09-24T19:02:32+5:30
जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ९० टक्के पाऊस : दहा महसुल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद
जळगाव - जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठा तडाखा दिला असून, धरणगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर पाळधी महसुल मंडळात एकाच रात्री तब्बल १८२ मिमी पाऊस झाल्यामुळे शेतीसह इतर मोठे नुकसान झाले आहे. यासह जिल्ह्यातील १० महसूल मंडळांमध्ये देखील अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यावरील दुष्काळाचे हटले असल्याचे चित्र आहे.
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने कहर केला असून, जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २४ सप्टेंबरपर्यंत २१५ मिमी पाऊस झाला आहे. शनिवारी रात्री धरणगाव, पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, जळगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यात सर्वाधिक ७८ मिमी पाऊस हा धरणगाव तालुक्यात झाला आहे. तर जिल्ह्यात एकूण २६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून व ऑगस्ट महिन्यात पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच पावसाची सरासरी जेमतेम ६० ते ७० टक्क्यांपर्यंत राहिल अशी शक्यता होती. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून, २४ सप्टेंबरपर्यंत ९० टक्के पाऊस झाला होता. तसेच अजून जिल्ह्यातील सरासरीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या महसुल मंडळांमध्ये अतिवृष्टी...
महसुल मंडळ - झालेला पाऊस
पाळधी - १८२ मिमी
सोनवद - ९२ मिमी
पिंप्री - ९२ मिमी
कोळगाव - ६६ मिमी
पिंपळगाव - ६९ मिमी
नगरदेवळा - ६६ मिमी
नांद्रा - ६५.३ मिमी
एरंडोल - ७३ मिमी
रिंगणगाव - ७० मिमी
उत्राण - ६७ मिमी