वडली, पाथरी परिसरात मुसळधार पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:28 PM2019-06-26T12:28:47+5:302019-06-26T12:29:20+5:30
मातीचे बंधारे वाहून गेले
जळगाव : दिर्घ प्रतिक्षेनंतर तालुक्यातील वडली, पाथरी, सामनेर, लासगाव (ता.पाचोरा) या परिसरात मंगळवारी सायंकाळी सहा ते सात मुसळधार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात गावातील नद्या व नाल्यांना पूर आला असून वडली व पाथरी येथे रस्त्यावर बांधण्यात आलेले मातीचे बंधारे वाहून गेले आहेत. दरम्यान, या पावसामुळे पाचोरा व जळगावकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
जून महिना संपण्यात आला तरी पाऊस येत नसल्याने शेतकरी चिंतेत होता. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कापसाची लागवड केली, मात्र विहिरी व कुपनलिका आटल्याने हे पीकेही धोक्यात आली होती तर कोरडवाहू शेतकºयांनी पेरणीच केलेली नव्हती. सर्व शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. अशातच मंगळवारी सायंकाळी सहा वाजता वडली, पाथरी, सामनेर, बांबरुड, लासगाव या भागात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल एक तास मुसळधार पाऊस झाल्याने नदी व नाले एक झाले होते. सामनेर व नांद्रा परिसरात वृक्ष उन्मळून पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
शेतातील पीके वाहिल्याने नुकसान
वडली व पाथरी येथे रस्त्याच्या कामासाठी तयार करण्यात आलेले कच्चे रस्ते, पुल व बंधारे पाण्यात वाहून गेल्याने तेथे आलेल्या पुरामुळे वाहने ओलांडून जावू शकत नव्हते.
पाणी ओसरल्यानंतर लोखंडी सळई व पाट्या टाकून वाहनांमधील प्रवाशांना इतरत्र हलविण्यात आले.
पाथरी येथे महेंद्रसिंग विजयसिंग पाटील यांच्या शेतातील पीके वाहून गेली. रस्त्याच्या कामामुळे या शेतकºयाचे नुकसान झाले आहे. कंत्राटदाराला सूचना देऊनही त्याने कामात सुधारण केली नसल्याचे शेतकºयाचे म्हणणे आहे. वडली येथे पुल पाडून मातीचा भराव करुन पर्यायी कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. हा पुल व रस्ताही वाहून गेला आहे.
कच्चे पूल व मातीचे भराव वाहून गेल्यामुळे रस्ताच बंद झाल्याने वावडदा येथून म्हसावद, माहेजी मार्गे पाचोराकडे वाहतूक वळविण्यात आली. पाचोराकडून येणारी वाहतूक नांद्रा, माहेजी, म्हसावदमार्गे वळविण्यात आली होती