नांदेड परिसरात जोरदार वादळी पाऊस, पत्रे उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 09:33 PM2021-05-29T21:33:14+5:302021-05-29T21:33:44+5:30
नांदेड परिसरात पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड, ता . धरणगाव : २९ रोजी सायंकाळी या भागात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे काही घरांवरील पत्रे हवेत उडाले तर काही भागात वृक्ष उन्मळून विजेच्या तारांवर पडले यामुळे वीज पुरवठाही खंडीत झाला.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे गावातील बऱ्हाटेवाडा भागातील विठ्ठल मंदिरावर असलेले पत्र्यांची शेड उडून समोरच्या कौतीकश्रावणचौधरी व केतन दिनकर बऱ्हाटे यांच्या घरांवर घडकले. तेथील विजेच्या पोलवर पत्रे धडकल्याने विजेच्या तारा तुटून लोखंडी पोलदेखील वाकला आहे. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
तसेच गावासह खळवाडीतील अनेकांची पत्रे वादळामुळे हवेत उडालीत गाव व गावालगतच्या भागातील काही वृक्ष वादळामुळे उन्मळून विजेच्या तारांवर पडल्याने काही भागात विजेच्या तारा तुटल्यात. परिणामी साळवा सबस्टेशनमधून होणारा परीसरातील गावांमधील वीजपुरवठा खंडीत झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीजकंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.
धरणगाव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी
धरणगाव शहरासह धरणगाव तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली दिसते. वारा वादळासह शनिवारी दुपारी ४ वाजेनंतर अर्धा तास धरणगाव शहरात पाऊस झाला.