जिल्हाभरात जोरदार पावसाने पुन्हा झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 09:21 PM2019-09-19T21:21:44+5:302019-09-19T21:21:48+5:30
पुरात वाहून बैल ठार : सततच्या रिपरिपीने पिकांचे नुकसान
जळगाव : जिल्हाभरात दररोज जोरदार पाऊसस होत असून सततच्या पावसाने पिकांचेच नुकसान होत आहे. नद्या-नाले तुडूंब भरले आहे. अनेक ठिकाणी पिके वाया गेली आहे. तर सतत पाण्यात बुडून जनावरे दगावल्याच्या घटना घडत आहेत.
सावद्यात मुसळधार
सावदा परिसरात १९ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तालुकाभरात दररोज पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाला लोक कंटाळले असून परिसरातील पिके पिवळी पडत आहेत. गुरुवारी येथील लेंडी गल्लीला नदीचे स्वरूप आले होते. पाताळगंगा नदीत केलेले खोलीकरण पाण्याने तुडुंब भरुन लाखो लिटर पाणी जमिनीत मुरले गेले. त्यामुळे आनंदाचे वातावरण दिसत होते. तर दुसरीकडे रब्बीच्या पिकाला अति पाण्यामुळे फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. उडीद आणि मुगाचे पीक हातून गेल्याचे चित्र आहे.
चाळीसगाव तालुक्यात ८७ टक्के पाऊस
गेल्या मंगळवारी मध्यरात्रीपासून चाळीसगाव शहर व तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी पाटणादेवी येथे झालेल्या पावसामुळे पाटणादेवी मंदिराच्या पुलावर पाणी आले होते. त्यामुळे भाविक व पर्यटकांनी सतर्कता बाळगत मंदिरातून काढता पाय घेतला. वलठाण तसेच कोदगाव परिसरातही झालेल्या जोरदार पावसामुळे या धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. शहरासह तालुक्यात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शहरात सततच्या पावसामुळे सर्वत्र चिखल झाला असून खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणे जिकरीचे ठरत आहे.
तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान ६६०.०६ मि.मी. इतके आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार तालु्क्यात ५७६ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. ही सरासरी ८७.३ टक्के इतकी आहे. गतवर्षी याच तारखेला तालुक्यात केवळ ४४२.८ मि.मी. इतका म्हणजे वार्षिक सरासरीच्या ६७ टक्के इतका पाऊस झाला होता. यंदा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटणार असून टँकरच्या खेपाही वाचणार आहेत. तसेच सिंचनाचीही समस्या मिटणार आहे.
चोपडा : सरासरीच्या १११ टक्के
तालुक्यात यावर्षी सरासरी १११ टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली असून जवळपास पाच वर्षांनंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भासत होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत होते. मात्र या वर्षी तालुक्यातील ६९१ मिमी. सरासरी पावसाची नोंद मोडीत ७६८.०५७ मिलिमीटर एवढा पाऊस तालुक्यात झाला. मंडळनिहाय आकडेवारी : चोपडा- ७७४ मिमी, अडावद- ८१७ मिमी, धानोरा- ८८५ मिमी, चहार्डी- ७२१ मिमी, गोरगावले- ६२१ मिमी, हातेड- ७१५ मिमी, लासूर- ८५३ मिमी. एकूण ५ हजार ३७६ मिमी पाऊस झाला असून सरासरी ७११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
म्हैस वाहून गेली, नदीत जीप पडली... अजिंठा घाटमाथावर झालेल्या जोरदार पावसामुळे तोंडापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिसरातील पिकांचे नुकसान झाले असून पुरात म्हैस वाहून गेली. गुरुवारी तोंडापूर येथे गावातील पुलावरुन जात असलेली जीप नदीत पडली, मात्र कोणतीही जिवीत हानी झाली नाही.