दमदार पावसाने नशिराबादजवळ महामार्ग खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:51+5:302021-06-30T04:11:51+5:30
नशिराबाद, जि. जळगाव : सोमवारी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत झालेल्या दमदार पावसाने नशिराबादजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचा काही भाग खचला असून ...
नशिराबाद, जि. जळगाव : सोमवारी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत झालेल्या दमदार पावसाने नशिराबादजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचा काही भाग खचला असून यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या पावसाने महामार्गाला लागून असलेल्या २५ एकर शेतात पाणी साचले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर चिखली ते फागणे दरम्यान महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम करीत असताना नशिराबाद ते जळगाव दरम्यान असलेल्या एका नाल्याचा प्रवाह बदलवून १०० फूट लांब नाला केल्याने पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. सोमवारी संध्याकाळी जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. या पहिल्याच दमदार पावसाने नशिराबाद ते जळगाव दरम्यान महामार्गाचा काही भाग खचला आहे. यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. महामार्ग खचण्यासह त्याला लागून असलेल्या शेतात पाणी साचले. यामुळे २५ एकर शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.