भुसावळ तालुक्यातील कन्हाळे बुद्रूक येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 03:05 PM2019-05-21T15:05:09+5:302019-05-21T15:08:27+5:30

भुसावळ तालुक्यातील कन्हाळे बुद्रूक येथे गेल्या सात-आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे तब्बल २० ते २२ दिवसांनंतर पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना घागरभर पाण्यासाठी शेजारील कन्हाळे खुर्द गावात भटकंती करावी लागत आहे.

Heavy water shortage in the Khamhala Budurk area in Bhusawal taluka | भुसावळ तालुक्यातील कन्हाळे बुद्रूक येथे भीषण पाणीटंचाई

भुसावळ तालुक्यातील कन्हाळे बुद्रूक येथे भीषण पाणीटंचाई

Next
ठळक मुद्देतब्बल २० ते २२ दिवसांनंतर मिळते नागरिकांना पाणीहातपंपावर पाणी भरण्यासाठी जावे लागते शेजारच्या गावातचौदाव्या वित्त आयोगाचे दोन लाख गेले पाण्यातभारत निर्माण योजनेचाही बोजवारातातडीच्या पाईपलाईनवर आचारसंहितेची छाया?रात्रीचा नमाज सोडून फिरावे लागते घागरभर पाण्यासाठी

उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कन्हाळे बुद्रूक येथे गेल्या सात-आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे तब्बल २० ते २२ दिवसांनंतर पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना घागरभर पाण्यासाठी शेजारील कन्हाळे खुर्द गावात भटकंती करावी लागत आहे. येथे भारत निर्माण योजना राबविण्यात आली आहे. मात्र त्या योजनेचाही बोजवारा उडाला आहे. परिणामी हे गाव पाणीटंचाईच्या संकटात सापडले आहे. दरम्यान, टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी टँकरच्या केवळ दोनच खेपा मिळत असल्यामुळे पाणीटंचाई गंभीर स्वरूप धारण केले आहे. दरम्यान, गावाला लागून असलेले कन्हाळे खुर्द येथे मात्र पिण्याच्या पाण्याचे संकट दूर असून येथील हात पंपावरून कन्हाळे बुद्रूक येथील महिला पाणी भरत असल्याचे चित्र आहे.
कन्हाळे बुद्रूक येथील लोकसंख्या सुमारे एक हजार ९०० आहे. येथे ओ.डी.ए. योजना बंद झाल्यानंतर २०११-१२च्या सुमारास भारत निर्माण योजना राबविण्यात आली आहे. मात्र या योजनेचे बारा वाजले आहेत. त्यानंतर येथे एका ट्यूबवेलवरून पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या दोन वर्षापासून पर्जन्यमान अतिशय कमी झाले. त्यामुळे ट्यूबवेलचे पाणीही गेल्या वर्षभरापासून आटले आहे. परिणामी गावावर पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे.
चौदाव्या वित्त आयोगाचे दोन लाख गेले पाण्यात!
दरम्यान, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाच-सहा महिन्यांपूर्वी चौदाव्या वित्त आयोगातून दोन लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. यावेळी कन्हाळा खुर्द गावासाठी खडका येथील एका शेतकऱ्याच्या गट क्रमांक ६१ मधून विहीर अधिग्रहित केली आहे. याच शेतातून कन्हाळे बुद्रूक ग्रामपंचायतीनेही दोन लाख रुपये खर्च करून पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकली आहे. या तातडीच्या पाणीपुरवठा योजनांसाठी या शेतकºयाला दोन ते अडीच महिन्यांपासून २४ तास वीज मिळत आहे. मात्र शासन एकच वेळेस दोन गावांसाठी विहीर अधिग्रहित करू शकत नसल्यामुळे व दोन ठिकाणी पैसे देऊन शकत नसल्यामुळे संबंधित शेतकरी व कन्हाळे खुर्द ग्रामपंचायत यांनी कन्हाळे बुद्रूक येथील पाणीपुरवठा बंद केला असल्याचे समजते. त्यामुळे दोन लाख रुपये पाण्यात गेले असल्याचे दिसून येत आहे.
येथे पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरती पाईपलाईन मंजूर करण्यात आली आहे. यासाठी चार लाख 80 हजार रुपये मंजूर आहे. मात्र आचारसंहितेच्या नावाखाली या पाईपलाईनचे काम करण्यास टाळाटाळ करण्यात आली असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे. या माहितीला सरपंच राजेंद्र पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. आचारसंहितेच्या नावाखाली येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
रात्रीचा नमाज सोडून फिरावे लागते घागरभर पाण्यासाठी
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांचे उपवासही सुरू आहे. येथे मुस्लीम बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र रात्री तरबी नमाज असते. तरीही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
गावाला पाणी सोडण्यासाठी सोळा व्हॉल आहे. मात्र या ट्यूबवेलवरून एक टाकी भरण्यासाठी किमान तीन दिवस लागतात. परिणामी तब्बल २० ते २५ दिवसांनंतर येथे पाणीपुरवठा होत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणीपुरवठा मंत्र्यांनाही दिले निवेदन
- सरपंच राजेंद्र पाटील
दरम्यान, येथे पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या गावाचा समावेश जलस्वराज्य टप्पा -दोनमध्ये करण्यात यावा, अशी मागणी येथील सरपंच राजेंद्र पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांना निवेदन देऊन केली आहे, तर वेल्हाळे प्रकल्पातून नाल्यांमध्ये पाणी सोडल्यास या गावासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटू शकतो, असे सरपंचांनी ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले.

Web Title: Heavy water shortage in the Khamhala Budurk area in Bhusawal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.