मृत कर्मचा-याच्या वारसास सरकारी नोकरी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:16 AM2021-05-12T04:16:25+5:302021-05-12T04:16:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोविड-१९च्या कर्तव्यावर असलेल्या अनेक शिक्षकांना आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव गमवावा लागला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोविड-१९च्या कर्तव्यावर असलेल्या अनेक शिक्षकांना आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव गमवावा लागला आहे. त्या शिक्षकांना शासकीय विम्याचा लाभ मिळावा. त्याचप्रमाणे मृत कर्मचाऱ्याच्या वारसास सरकारी नोकरी मिळावी, अशी मागणी खाजगी प्राथमिक महासंघातर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
मंगळवारी खाजगी प्राथमिक महासंघाच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या कोविड संदर्भातील विविध नियुक्त्या व त्यासंदर्भातील त्यांच्या विविध समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व चर्चा केली. यावेळी शिक्षकांच्या समस्या जाणून घेवून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच जर कोविड रोखण्यासाठी नियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला असेल तर शासन निर्णयानुसार विभागामार्फत योग्य कागदपत्रांसह सविस्तर प्रस्ताव पाठवा शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा केला जाईल असेही आश्वासन देण्यात आले.
अशा आहेत मागण्या
- ५० वर्ष वय असणाऱ्या तसेच व्याधीग्रस्त शिक्षकांना आदेश देवू नयेत.
- शिक्षकांसोबत इतर विभागातील कर्मचाऱ्यांचाही यात विचार व्हावा.
- कर्तव्यावर हजर होण्यापूर्वी शिक्षकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे.
- कर्तव्यावर असताना त्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा व साधने त्यांना पुरविली जात नाहीत. त्या पुरविल्या जाव्यात.
-एकाच शिक्षकांस वारंवर कोविड-१९ ची आदेश देण्यात येवू नये तसेच सर्वेक्षण अथवा हॉस्पिटलमध्ये कर्तव्याचा कालावधीत निश्चित असावा.
- कोविड-१९ च्या कर्तव्यावर असतांना सर्व विभागातील कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य बाधित झाल्यास त्यांच्यावर प्राधान्याने उपचार देण्यात येवून उपचार मोफत केले जावेत व त्यासाठी जिल्हास्तरावर यंत्रणा कार्यान्वित करावी.