खान्देश शिक्षण मंडळातील मयत सभासदांचे वारस फेलोशिपपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:34+5:302021-07-01T04:12:34+5:30
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या मयत सभासदांच्या वारसांना फेलोशिप देण्याचा विषय संस्थेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला असताना ...
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या मयत सभासदांच्या वारसांना फेलोशिप देण्याचा विषय संस्थेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला असताना आणि त्रैवार्षिक निवडणुकीची वेळ नजीक येऊनही मयतांचे वारस फेलोशिपपासून वंचितच आहेत. सत्ताधारी संचालक न्याय देण्यात कमी पडल्याचा आरोप भाजपचे माजी शहराध्यक्ष शीतल देशमुख यांनी केला आहे.
काही सभासदांच्या मृत्यूनंतर वारसांमध्ये या फेलोशिपवरून वाददेखील झाले आहेत. जनरल सभेच्या ठरावानंतर अनेक मयत सभासदांच्या वारसांच्या अर्जाची संस्थेत थप्पी लागली असून, संस्थेकडे विलंबाची कारणे विचारली असता धर्मदाय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला असून, अजून मंजुरी मिळालेली नाही. ती मिळाली की फेलोशिप दिली जाईल, असे कारण सांगितले जाते. मात्र अर्ज स्वीकारला जात असल्याने काही वारसांना आपणाला फेलोशिप मिळणारच, असा भास निर्माण होतो.
प्रत्यक्षात घेतलेल्या माहितीनुसार, धर्मदाय आयुक्तांकडे संस्थेने खरोखरच पाठपुरावा केला की हा विषय हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवण्यास सांगितला, अशी शंका आता येऊ लागली आहे. विद्यमान संस्थाचालकांची इच्छा नसताना केवळ सभासदांच्या रेट्यामुळे सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे केवळ सभासदांचे समाधान म्हणून वारसांचे अर्ज जमा करत राहावे आणि हा विषय प्रलंबित ठेवावा, असेच धोरण असावे, अशी शक्यता निर्माण होत आहे. एका सभासदांचे निधन झाल्यानंतर मंडळात फेलोशिपवरून त्यांच्या वारसांमध्ये प्रचंड वाद झाले. अखेर त्यांच्यात तडजोड होऊन एकाने मोठी रोख रक्कम दुसऱ्या भावाना देऊन स्वतः फेलोशिपसाठी त्या रकमेवर पाणी सोडले. त्यानंतर सर्वांच्या सहीचा नाहरकत स्टॅम्प करून तो संस्थेकडे एका भावाच्या फेलोशिपसाठी अर्जासोबत देण्यात आला. असे अनेक किस्से या फेलोशिपसाठी असून, यावरून याचे महत्त्व किती याची कल्पना येऊ शकते.