तोंडापूर येथे अवैध धंद्यांमुळे बाजाराच्या दिवशीच हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 09:52 PM2019-12-20T21:52:59+5:302019-12-20T21:54:09+5:30

बसस्थानक परिसरात बाजाराच्या दिवशीच अवैध धंद्यांवरून शुक्रवारी दोन गटात हाणामारी झाली. मात्र हा वाद येथेच मिटविण्यात आल्याने प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले नाही.

Held on the market day due to illicit business at Mondapur | तोंडापूर येथे अवैध धंद्यांमुळे बाजाराच्या दिवशीच हाणामारी

तोंडापूर येथे अवैध धंद्यांमुळे बाजाराच्या दिवशीच हाणामारी

Next
ठळक मुद्देबसस्थानक परिसरात सुरू आहेत अवैध धंदेहाणामारीनंतर प्रकरण मिटले आपसात

तोंडापूर, ता.जामनेर, जि.जळगाव : येथील बसस्थानक परिसरात बाजाराच्या दिवशीच अवैध धंद्यांवरून शुक्रवारी सायंकाळी दोन गटात हाणामारी झाली. मात्र हा वाद येथेच मिटविण्यात आल्याने प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले नाही. मात्र ही हाणामारी झाली तेव्हा नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.
येथे सट्टा, पत्ता व दारू हे अवैध धंदे सर्रास सुरू असून, पोलीस प्रशासनही याकडे कानाडोळा करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. येथे दोन जुगार अड्डे, चार सट्टा पेढ्या, सात ते आठ गावठी व देशी दारुची दुकाने भर रस्त्यावरच आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हे चित्र अनुभवायला मिळते. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. याच ठिकाणी पत्त्यावरून दोन गटात हाणामारी झाली. मात्र प्रकरण मिटविण्यात आले. त्यामुळे पोलिसात कोणतीही नोंद नाही.
तब्बल ५३ वेळा आॅनलाईन तक्रारी
तोंडापूर येथील अवैध धंद्याना कंटाळून गावातून तब्बल ५३ आॅनलाईन तक्रारी अर्ज करण्यात आल्या आहेत. असे असले तरी पोलीस आल्यावर अगोदरच गुप्त माहितीवरून अवैध धंदे लगेच बंद होतात. त्यामुळे पोलिसांनाही खाली हात जावे लागते. गावातील काही तरुण व सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन हे अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे अवैध धंदे बंद होण्याऐवजी खुलेआम सुरू झाल्याने पोलीस प्रशासनही हतबल झाल्याचे नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तोंडापूर हे १५ हजार लोकवस्तीचे गाव असून, येथे गोरगरीब लोक राहतात. त्यातील बºयाच लोकांना दारुचे व्यसन लागले आहे. दारूबंदीसाठी महिलांनीदेखील पहूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ग्रामसभेत दारू, सट्टा, पत्ता बंदीचा ठराव करण्यात आला. मात्र हे धंदे बंद का होत नाहीत, ही ग्रामस्थांसमोरील समस्या आहे. परिणामी कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. -

गावात अवैध धंद्याबाबत पोलीस ठाण्यात बºयाच वेळा कळविले आहे. असे असले तरी तितक्यापुरती त्यांच्यावर कारवाई होते. मात्र चोरुन धंदे सुरुच आहेत. -सुलोचना जितेंद्र पाटील, पोलीस पाटील, तोंडापूर


मी पहूर पोलीस स्टेशनला अवैध धंद्यांबाबत निवेदन दिले. आॅनलाईन तक्रार केली. तरीही हे अवैध धंदे बंद झाले नाहीत. -राम अपार, तालुका सचिव, संभाजी ब्रिगेड, जामनेर

तोंडापूर येथे आज सायंकाळी सहा वाजता झालेल्या घटनेबाबत पोलिसात कोणतीही तक्रार नाही. तरी उद्या अवैध धंद्यावर गुप्त रेड टाकणार आहे. -राकेशसिंग परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक, पहूर, ता.जामनेर

Web Title: Held on the market day due to illicit business at Mondapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.