हेल्मेट सक्ती योग्यच;पण अतिरेक नको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:23 AM2019-02-09T10:23:50+5:302019-02-09T10:26:35+5:30
रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी महामार्गावर हेल्मेट सक्ती लागू केली आहे. रस्त्यावरची सुरक्षा लक्षात घेता कारला सीट बेल्ट व दुचाकीस्वाराजवळ हेल्मेट असणे आवश्यकच आहे. महामार्गावर झालेल्या अपघाताच्या घटनांमध्ये बहुतांश अपघातात सीटबेल्ट व हेल्मेटमुळेच प्राण वाचले आहेत.
सुनील पाटील
जळगाव : रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी महामार्गावर हेल्मेट सक्ती लागू केली आहे. रस्त्यावरची सुरक्षा लक्षात घेता कारला सीट बेल्ट व दुचाकीस्वाराजवळ हेल्मेट असणे आवश्यकच आहे. महामार्गावर झालेल्या अपघाताच्या घटनांमध्ये बहुतांश अपघातात सीटबेल्ट व हेल्मेटमुळेच प्राण वाचले आहेत. अपघात रोखणे शक्य झाले नाही, मात्र कार व दुचाकीस्वाराने ही काळजी घेतल्यामुळे प्राण वाचल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही घटनांमध्ये हेल्मेट असतानाही दुचाकीस्वाराचा बळी गेलेला आहे. हेल्मेट घेताना कारवाईपासून बचाव व्हावा याच हेतून तकलादू हेल्मेट घेतले गेल्याने त्यात हे हेल्मेटही निष्फळ ठरले आहे. त्यामुळे हेल्मेट घेतानाही त्याचा दर्जा चांगला असावा, अपघातात जीव वाचू शकेल अशाच दर्जाचे हेल्मेट असावे.
सध्या महामार्गावर असलेल्या हेल्मेट सक्तीमुळे काही पोलिसांकडून जरा जास्तच अतिरेक होत असल्याच्या तक्रार येवू लागल्या आहेत. महामार्गाला जोडणाºया रस्त्यावर देखील हेल्मेटचा धाक दाखवून कारवाया केल्या जात आहे. प्रत्येक कर्मचाºयांना कारवाईचे उद्दीष्टे दिलेले आहे. हे उद्दीष्ट पुर्ण झाले कि कर्मचारी आपले उद्दीष्ट पूर्ण करताना दिसत आहे. त्यामुळे हा अतिरेकच होत आहे. एखाद्या दुचाकीस्वाराकडे वाहन परवाना असला तरी त्याला अन्य कागदपत्रांची सक्ती केली जाते. निव्वळ दुचाकीस्वार टार्गेट करणेही चुकीचेच असल्याचा मतप्रवाह आहे. अवैध प्रवाशी वाहतूक करणारे तसेच क्षमतेपेक्षा जास्त भार असलेली वाहने पोलीस व आरटीओ यांच्या डोळ्यादेखत वावरत असताना त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते अन् दुचाकीस्वाराला टार्गेट केले जाते. हा पक्षपातीपणा नाही तर काय? शहरातील चौकाचौकात दुचाकीस्वारांना घोळक्याने अडविले जाते. जणू त्याने काही मोठा गुन्हाच केला आहे, या पध्दतीची वागणूक दुचाकीस्वाराला दिली जाते. एखादी दुचाकीस्वार अरेरावी करीत असेल, भरधाव वेगाने वाहन चालवून स्वत: तसेच दुस-याच्या जीवाशीही खेळत असेल तर अशा दुचाकीस्वाराच्याबाबतीत समजू शकेल, मात्र सर्वांनाच एका रांगेत बसविणेही योग्य नाही.काही वाहतूक कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावताना दिसतात. महिला पोलिसांच्या बाबतीत अजून तरी तक्रारी नाहीत. त्यामुळे एका विभागात असलेल्या कर्मचा-यांची काम करण्याच्या वेगवेगळ्या पध्दतीने दुचाकीस्वारधारक वैतागले आहेत. वरिष्ठ अधिकाºयांनीच हा विषय गांभीर्याने घेऊन होणारा अतिरेक रोखावा.