निधी मिळाल्याने रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:39+5:302021-01-15T04:14:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहराच्या विकासकामांसाठी शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत दिलेल्या १०० पैकी ४२ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहराच्या विकासकामांसाठी शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत दिलेल्या १०० पैकी ४२ कोटींच्या निधिवरील स्थगीती शासनाने उठविली आहे. तसेच मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. त्यातुन रस्त्यांचा कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महापौरांनी दिली.
यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत, कुलभूषण पाटील, दिलीप पोकळे, चंद्रशेखर पाटील, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, भारत सपकाळे, गजानन देशमुख, कुंदन काळे, उत्तम शिंदे, इंद्रजीत राणे आदी उपस्थित होते.
४२ कोटींच्या कामावरील स्थगिती उठली असून मक्तेदार श्रीश्री एबीडब्ल्यू जेव्ही या मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले असून लवकरच पुढील विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.
स्वतंत्र खात्यात ५.१० कोटी निधी वितरित
मनपासाठी ४१.९५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यात शासनामार्फत प्रकल्पाच्या ७० टक्के म्हणजे २९.३६५ कोटींचे अनुदान असणार आहे. तसेच मनपाचा हिस्सा ३० टक्के म्हणजेच १२.५८५ कोटी असणार आहे. संपूर्ण योजनेच्या कामासाठी मनपाने बँकेत स्वतंत्र खाते उघडले असून मनपाने स्वतःच्या हिश्शातील ५.१० कोटींचा निधी त्या खात्यात वितरित करण्यात आला असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.