खाकीच्या मदतीने वाट चुकलेले बालक पालकांच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:54+5:302021-07-07T04:20:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आई, वडील घरात कामात असताना अंगणात खेळत असलेले तीन वर्षांचे बालक गल्लीतील रस्त्यावर आले ...

With the help of khaki, the missing child is in the arms of the parents | खाकीच्या मदतीने वाट चुकलेले बालक पालकांच्या कुशीत

खाकीच्या मदतीने वाट चुकलेले बालक पालकांच्या कुशीत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आई, वडील घरात कामात असताना अंगणात खेळत असलेले तीन वर्षांचे बालक गल्लीतील रस्त्यावर आले अन‌् बघता बघता ते थेट अजिंठा चौक परिसरात महामार्गावर पोहचले. वाहतूक पोलिसांनी त्याला मायेने जवळ घेऊन खायला देत एमआयडीसी पोलिसात नेले. दुसरीकडे मुलगा दिसत नाही म्हणून आई, वडील कासावीस झाले. त्याचा शोध घेत ते पोलीस ठाण्यात पोहोचले, तेथे मुलाला पाहून आईने त्याला अश्रू ढाळतच मिठीत घेतले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्यानगरातील सागर अंजनीकुमार मुंदडा व राधिक मुंदडा यांचा तीन वर्षांचा पर्व हा मुलगा मंगळवारी दुपारी घरीच खेळत होता. खेळताना तो गल्लीत आला. हळूहळू चालत तो ‌थेट अजिंठा चौकानजीकच्या एका शोरूमच्या समोरून चालतच आला. वाहनांचा गोंगाट व अनोळखी चेहरे पाहून रडत असलेले बालक रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस पडले. बालकासोबत कोणीच नसल्याचे पाहून त्यांनी चौकात ड्युटीवर असलेल्या वाहतूक शाखेचे हवालदार संजीव महाले, विजय पाटील, सुनील नाईक व मंगेश बोडके यांच्या स्वाधीन केले. खाकीतील माणुसकीला पाझर फुटला अन‌् या पोलिसांनी सर्वात आधी त्याला खायला देऊन त्याचे रडणे बंद केले. कोणी पालक किंवा नातेवाईक शोधायला येतात का म्हणून अर्धा तास वाट बघितली. कुणीच न आल्याने पोलीस नियंत्रण कक्षात या बालकाबाबत माहिती कळविली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यालाही कळविण्यात आले. गोविंदा पाटील व इम्रान सय्यद या दोन्ही अंमलदारांनी या बालकाला घेऊन पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला कर्मचाऱ्यांजवळ त्याला बसवून सोशल मीडियावर तसेच ओळखीच्या लोकांशी संपर्क साधला.

आईच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू

पोलीस बालकाबाबत माहिती कळवत असतानाच आमचा मुलगा हरवला म्हणून सागर व राधिका मुंदडा तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धडकले. त्यांच्या मनात भीती तर डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ठाणे अंमलदाराजवळ कैफियत मांडणार तितक्यात समोर बालक दिसताच आईने त्याला कवेत घेतले. तणावातील अश्रूचे रूपांतर लगेच आनंदाश्रूत झाले. पोलीस डायरीला नोंद घेऊन पोलिसांनी बालकाला त्यांच्या स्वाधीन केले.

Web Title: With the help of khaki, the missing child is in the arms of the parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.