पोलिसांच्या मदतीने मजुर महिलेला ४६ हजार मिळाले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 09:27 PM2019-12-09T21:27:20+5:302019-12-09T21:27:25+5:30
व्यसनाधीन पतीनेच लांबविली रक्कम : वॉरंटमध्ये पोलिसांनी केली अटक
जळगाव : दहा वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला पोलिसांनी अटक केली, मात्र तत्पूर्वीच त्याने घरातून पत्नीचे ४८ हजार रुपये व्यसनासाठी लांबविल्याचा प्रकार उघड झाला. उधळपट्टी होण्याच्याआधीच पोलिसांनी त्यातील ४६ हजार रुपये वसूल करुन ती रक्कम पत्नीला परत दिली. हा प्रसंग पाहून या महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी ही सुखद घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबापुरातील दिलीप बाबुराव शेरमाळे हा २००९ मध्ये दाखल असलेल्या अपघाताच्या गुन्ह्यात फरार होता. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोध मोहीमेत शेरमाळे याला रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या आदेशाने राजेंद्र सैंदाणे, प्रवीण मांडुळे, महेंद्रसिंग पाटील व नितीन पाटील यांनी इच्छा देवी चौक परिसरातून ताब्यात घेतले.
अटकेची प्रकिया करण्यापूर्वी पोलिसांनी शेरमाळे याची पत्नी पद्माबाई यांना ही माहिती दिली असता, शेरमाळे याला दारुचे व्यसन असून त्याने घर संसाराचे ४८ हजार रुपये लांबविल्याची माहिती पोलिसांना दिली. निरीक्षक शिरसाठ यांनी त्याची चौकशी असता त्याने त्यातील काही रक्कम दारुसाठी खर्च केली होती तर ४६ हजार ६८० रुपये जवळ असल्याची कबुली दिली. शिरसाठ यांनी दम भरल्यानंतर त्याने ही रक्कम काढून दिली.सोमवारी दुपारी त्याची पत्नी पद्माबाई यांना ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. शेरमाळे कुटुंब मजुरी करतात. मुलांचे शिक्षण व घर संसारासाठी त्यांनी पै पै गोळा केले होते. ही रक्कम पोलिसांनी वसुल केली नसती तर दारुमध्ये त्याची उधळपट्टी झाली असती व कुटुंब उघड्यावर आले असते असे पद्माबाई यांनी पोलिसांना सांगितले..यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.