...इथे ओशाळली माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:35 AM2020-08-31T11:35:50+5:302020-08-31T11:36:00+5:30

दोन तास मृतदेह जागेवरच : चिखलात आढळला रेल्वे कर्मचाऱ्याचा मृतदेह

... here is humanity | ...इथे ओशाळली माणुसकी

...इथे ओशाळली माणुसकी

Next

जळगाव : कोरोनामुळे अनेक ठिकाणी माणुसकीच हरवल्याची उदाहरणे पहायला मिळतात. मात्र याचा प्रत्यय जळगावकरांनी रविवारी घेतला. एक मृतदेह चिखलात दोन तास जागेवरच पडून होता. मात्र त्याला कोरोना असेल, या भीतीने कुणीही त्याच्याजवळ फिरकले नाही. अखेर दोन तासांनी पोलिसांनीच त्याला उचलले. शिवाजीनगर हुडको परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. हरीष तुळशीराम सोनवणे (४५, रा.शिवाजीनगर हुडको) असे या मृताचे नाव आहे. हरीष हे रेल्वेत गँगमन म्हणून नोकरीला होते.
पालिकेच्या कृपेने साचलेल्या चिखलातच हा मृतदेह आढळून आल्याने चिखलामुळे पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज शिवाजीनगरमधील रहिवाशांनी केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालात हृदयविकराचा झटका आल्याचे निदान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे हे रेल्वेत गँगमन म्हणून नोकरीस होते. रविवारी सकाळी ७.३० वाजता त्यांचा मृतदेह परिसरातील रस्त्यावर चिखलात आढळून आल्याने खळबळ उडाली.
-कोरोनाच्या भीतीने दोन तास मृतदेहाजवळ कोणी गेलेच नाही. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना घटना कळविली व हा मृतदेह रुग्णवाहिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला होता.
- वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची सुरतवाला यांनी शवविच्छेदन केले. सोनवणे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निदान या अहवालातून आले आहे.
- या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार संजय झाल्टे व पोलिस नाईक दिलीप पाटील तपास करीत आहेत. मृत सोनवणे यांच्या पश्चात आई कुसुमबाई, पत्नी टीना, मुलगा राहुल व मुलगी पूनम असा परिवार आहे.

मृतदेहाशेजारी बूट कसे?
दरम्यान, शवविच्छेदन अहवालानुसार, सोनवणे यांचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला आहे. मात्र जर हृदयविकाराने मृत्यू झाला असेल तर मग त्याचे बूट त्याच्या पायात असण्याऐवजी मृतदेहाशेजारी कसे आले? वा नागरिकांच्या मताप्रमाणे जरी हा मृत्यू चिखलात पडल्यामुळे झाला असला तरीही या बुटांचा प्रश्न उरतोच! दरम्यान, हा मृत्यू कोरोनामुळे झाला असावा, असा कयास काढून नागरिकांनी या मृतदेहाला हात लावणे तर सोडच, परंतु त्या मृतदेहाशेजारी जाणेही टाळले. त्यामुळेच हा मृतदेह निदर्शनास आल्यानंतरही दोन तास जागेवरच पडून होता. आता पालिकेच्या कृपेने चिखलात पडलेला हा मृतदेह त्यानंतर नागरिकांच्या बेर्पवाईमुळे दोन तास तसाच पडून होता. पोलिसांवर हा मृतदेह उचलून नेण्याची वेळ आली.


 

Web Title: ... here is humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.