येथे मिळतो कळणा-कोंड्याच्या भाकरीचा प्रसाद
By विलास.बारी | Published: August 23, 2017 06:16 PM2017-08-23T18:16:55+5:302017-08-23T19:30:12+5:30
कुर्हे पानाचे येथील ८४ सिद्ध चौरंगीनाथ बाबा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त पोळ्याच्या पाडव्याला यात्रोत्सव
विलास बारी / आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२३ - शेती आणि शेतमजुरी अशी पार्श्वभूमी असलेल्या कुर्हे पानाचे (ता. भुसावळ) येथे पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी ८४ सिद्ध चौरंगीनाथ बाबा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त यात्रेचे आयोजन केले जाते. ९०० वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रोत्सवात कळण्याची भाकरी, ठेचा आणि कांदा याचा प्रसाद म्हणून सेवन करीत नवसपूर्ती केली जाते.
भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे हा भाग प्राचीन काळी दंडकारण्य म्हणून परिचित होता. वन आणि वन्यजीवांच्या अधिवासाने समृद्ध असलेल्या या अरण्यामध्ये हर्षोत्तर कालखंडाच्या उत्तरार्धात नवनाथ परंपरेतील ८४ सिद्ध चौरंगीनाथ बाबा यांनी समाधी घेतली होती.
९०० वर्षांची परंपरा
चौरंगीनाथ बाबा यांच्या समाधी मंदिराची विक्रम सवंत ११११ मध्ये बांधकाम करण्यात आले होते. त्यानुसार पोळ्याच्या दिवशी पालखी मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर दुसºया दिवशी समाधी सोहळ्याचा कार्यक्रम होत असतो. ब्रिटीशांची राजवट असताना सर जॉर्ज रसलक्लार्क यांनी सन १८६३ मध्ये तत्कालिन पुजारी भिकन नाथ यांना दानपत्र व ६ एकर ११ गुंठे जमीन बहाल केली होती.
क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा
जिल्हा परिषदेने या मंदिराला सन २००४ मध्ये क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा दिला होता. त्यानुसार या ठिकाणी काही सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्षी भाविकांची दर्शनासाठी व नवसपूर्तीसाठी गर्दी वाढत आहे.
कळण्याची भाकरी, ठेचा व कांद्याचा प्रसाद
शेतकरी आणि शेतमजुरांची वस्ती असलेल्या कुर्हे पानाचे, गोजोरा व परिसरातील गावातील भाविकांची या मंदिरावर श्रद्धा आहे. या गावातील नागरिकांकडून कुटुंबातील सदस्यांना अपत्यप्राप्ती, कौटुंबिक सुख शांती, शेती, व्यापार व व्यवसायातील यशपूर्ती यासाठी नवस मानले जावू लागले. या नवसाची पूर्ती करण्यासाठी प्रसाद म्हणून कळण्याची (ज्वारी व उडीद मिश्रीत पिठाची भाकरी) भाकरी, ठेचा किंवा लाल मिरची, कांदा घेऊन जात मंदिर परिसरात कुटुंबातील सर्व सदस्य भोजन करीत असतात. वर्षानुवर्षे ही परंपरा कायम आहे.
कुर्हे येथे ८४ सिद्ध चौरंगीनाथ बाबा यांच्या समाधी सोहळ्याला ९०० वर्षांची परंपरा आहे. भाविक नवसपूर्तीसाठी कळण्याची भाकरी आणि ठेचा याचा प्रसाद समाधीस्थळी ठेवून नवसपूर्ती करीत असतात.
प्रवीण नाथ, सचिव, चौरंगीनाथ बाबा समाधी मंदिर ट्रस्ट, कुर्हे पानाचे.