अहो, हे जळगाव नव्हे...हे तर धूळगाव ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:40+5:302021-02-15T04:14:40+5:30

दुकान, मेडिकलमध्ये पाचवेळा करावी लागते सफाई : घरातून बाहेर निघताहेत तर पावडर लावण्याची गरज नाही लोकमत न्यूज नेटवर्क ...

Hey, this is not Jalgaon ... this is Dhulgaon ... | अहो, हे जळगाव नव्हे...हे तर धूळगाव ...

अहो, हे जळगाव नव्हे...हे तर धूळगाव ...

Next

दुकान, मेडिकलमध्ये पाचवेळा करावी लागते सफाई : घरातून बाहेर निघताहेत तर पावडर लावण्याची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील खराब रस्त्यांची समस्या आता दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. त्यातच खराब रस्त्यांमुळे प्रत्येक रस्त्यावर धुळीची समस्या निर्माण झाल्याने आता धुळीमुळे नागरिक घराबाहेर निघणेही टाळत आहेत. धुळीमुळे जळगावची ओळख आता जळगाव नव्हे तर धूळगाव अशी होत जात आहे. मात्र, मनपातील सत्ताधारी या समस्येकडे गांभीर्याने घेत नसून, आता जळगावकरांचा संयमाचा बांधदेखील सुटत आहे. नवीन रस्ते तर नाहीतच, आहेत तेही खराब होत आहेत. रस्त्यांवर धूळ इतकी प्रचंड प्रमाणात उडते की, ज्यामुळे रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांना दिवसातून पाचवेळी घराची सफाई करावी लागत आहे.

‘लोकमत’ ने शहरातील काही भागात जावून पाहणी केली. यामध्ये बी.जे.मार्केट ते स्टेडियमपर्यंतचा रस्ता, इच्छादेवी चौक ते डी-मार्टचा रस्ता, काव्यरत्नावली चौक ते डी-मार्ट पर्यंतचा रस्ता, गणेश कॉलनी चौक ते कोर्ट चौक, दूध फेडरेशन ते बजरंग बोगदा, गुजराल पेट्रोल पंप ते निमखेडी, दूध फेडरेशन ते एस.के.ऑईल मिल, स्वातंत्र्य चौक ते पांडे चौक-नेरी नाका चौक, या प्रमुख रस्त्यांसह दादावाडी, शिवाजीनगर, प्रेमनगर, अयोध्यानगर या उपनगरांमध्येही जावून पाहणी केली. या सर्व रस्त्यांवर प्रचंड धूळ पहायला मिळाली. या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अनेक नागरिकांनी घरांवर ग्रीन नेट लावलेले दिसून आले. अमृत योजना, मलनिस्सारण योजनेमुळे शहरात खड्डे निर्माण झाले, हे सत्य असले तरी ज्या ठिकाणी अमृतचे काम झालेले नाही, अशाही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच दुभाजकांच्या कामांमुळेदेखील रस्त्यांची वाट लागली आहे.

पदार्थ, फळांवरही धूळच-धूळ

नियमित उडणाऱ्या धुळीमुळे रस्त्यांवर उघड्यावर विक्री होणाऱ्या फळे, पदार्थ व भाजीपाल्यांवरदेखील प्रचंड धूळ बसते. त्यामुळे फळेविक्रेतेही त्रस्त असले तरी हे फळ किंवा पदार्थ खाल्ल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे. फळे, खाद्यपदार्थ कितीही झाकून ठेवले तरी त्यावर धूळ बसतेच, अशी माहिती राकेश माळी या विक्रेत्याने दिली.

सोशल मीडियावरही गाजतेय धूळ

जळगावातील धूळ आता सोशल मीडियावरदेखील ट्रेंड करू लागली आहे. शहरातील रस्ते व धुळीबाबत मोठ्या प्रमाणात मीम्स तयार केले जात आहेत. शहरातील धूळ आता थट्टेचा विषय झाला आहे. मात्र, या थट्टेबाबत मनपातील सत्ताधारीही मार्ग न काढता या मीम्सला मजेतच घेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे जळगाव शहराची अवघ्या राज्यभर बदनामी होत असताना, यावर तोडगा काढण्यासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसून येत नाही.

राष्ट्रवादी महानगरच्या बैठकीत धुळीवर चर्चा

शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी महानगरची बैठक घेतली. या बैठकीतदेखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील धुळीबाबत चर्चा केली. तसेच जयंत पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केली. यासह मनपा आयुक्तांच्या कामकाजाबाबतदेखील महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तक्रार केली आहे.

कोरोनामुळे लागलेली मास्कची सवय धुळीसाठी उपयोगी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांनी मास्क लावून कोरोनापासून बचाव केला. मात्र, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी कोरोनामुळे लागलेली मास्कची चांगली सवय आता धुळीपासून बचावासाठी फायदेशीर ठरत आहे.

धुलिकणांचे वाढले प्रमाण

खराब रस्त्यांमुळे गेल्या दोन वर्षांत शहरातील हवेच्या अहवालात वातावरणात मोठ्या प्रमाणात धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांच्या प्रमाणात धुलिकणांचे प्रमाण सरासरीपेक्षा हे प्रमाण अधिकच असून, धुलिकणांमुळे श्वसनाच्या विकारात वाढ होण्याची शक्यता आहे. श्वसनाद्वारे शरीरात जाणारे धुलिकण आरएसपीएम (रिस्पेरेबल सस्पेडंट पर्टिकुलर मॅटर) व श्वसनाद्वारे शरीरात न जाणारे धुलिकण आरएसपी (सस्पेडंट पर्टिकुलर मॅटर), दोन्ही धुलिकणांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची भीती आहे.

‘लोकमत’ ची भूमिका

शहरातील रस्त्यांचा समस्यांबाबत आतापर्यंत सत्ताधारी भाजपने केवळ गाजर दाखविण्याचे काम केले आहे. आश्वासनांमध्ये काही, तर प्रत्यक्षात काहीच अशी दुतोंडी भूमिका सत्ताधारी भाजपची आहे. तसेच विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडूनदेखील शहरातील रस्त्यांचा प्रश्नाबाबत सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यात विरोधी पक्ष म्हणून अपयश आले आहे.

कोट...

सकाळी मेडिकल उघडतो, तेव्हा सफाई केल्यानंतर प्रत्येक दोन तासांच्या आत दुकानाची सफाई करावी लागते. दिवसातून पाच ते सहावेळा सफाई करावी लागते. तसेच रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून पाणीदेखील मारावे लागते. दिवसातील अर्धा वेळ तर दुकानातील धूळ साफ करण्यातच जातो.

-श्रीराम चौधरी, मेडिकल चालक

रस्त्यालगत फळेविक्री करण्याचे मी अनेक वर्षांपासून काम करत आहे. शहरातील कोणत्याही भागात दुकान थाटले तरी त्याठिकाणच्या रस्त्यावर इतकी प्रचंड धूळ उडते की, ज्यामुळे फळांचा रंगदेखील धुळीसारखाच होवून जातो. द्राक्षांसारखे लहान फळ तर नागरिक घेणेही टाळतात.

-अयुब बागवान, फळ विक्रेता

दिवसातून पाचवेळा घराची आणि कंपाऊंडमधील सफाई करावी लागते. अर्धा तासातदेखील सफाई करण्याचे ठरविले तरी घरातून व कंपाऊंडमधूनदेखील मोठी प्रमाणात धूळ निघेल, दिवसर घरांचे दरवाजे बंद करून ठेवावे लागतात. तसेच कंपाऊंड भागात देखील हिरवी जाळी लावण्यात आली आहे. तरीही धूळ घरातच येते.

-सीमा पाटील, गृहिणी, गुड्डु राजानगर

Web Title: Hey, this is not Jalgaon ... this is Dhulgaon ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.