हाय रे दैवा! पुढील दोन दिवस ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 09:16 PM2021-04-14T21:16:39+5:302021-04-14T21:17:12+5:30
शासनाकडून पुढील दोन दिवस ऑक्सिजन सिलेंडर मिळणार नसल्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : शासनाकडून पुढील दोन दिवस ऑक्सिजन सिलेंडर मिळणार नसल्याच्या सूचना प्राप्त झाल्याने पाचोरा शहरातील वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून शहरातील १४ कोविड सेंटर पूर्णपणे रुग्णांनी भरलेले असून सर्वच कोविड सेंटरला ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध आहे. सुमारे ३५० बेड हे ऑक्सिजन युक्त असून ९१ बेड हे व्हेंटिलेटर युक्त ऑक्सिजन आयसीयू आहेत. या सर्वच बेडवर आज स्थितीत कोरोना उपचारार्थ रुग्ण दाखल असून या रुग्णांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असतानाही आता पुढील दोन दिवस ऑक्सिजनचा पुरवठा होणार नसल्याची बाब पुढे आली आहे.
ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या डीलरकडून पुढील दोन दिवस ऑक्सिजन सिलेंडर मिळणार नाही, अशा सूचना मिळाल्या असल्याने रुग्णांना उपचारार्थ काय करावे? हा प्रश्न डॉक्टरांपुढे उपस्थित झाला असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. यातच पाचोरा शहरातील औषध विक्रेत्यांकडे रेमेडिसीवर इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मात्र रुग्णांना चौपट भावाने हे इंजेक्शन आणावे लागत असून कोविड सेंटरच्या संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे इंजेक्शनची मागणी करूनही उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन पाचोरा शहरातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवावा व रेमडीसीवर इंजेक्शन कोव्हिडं सेंटरच्या संचालकांकडे साठा द्यावा, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातून केली जात आहे.