एटीएम मशीनमध्ये चोरटे लावतात छुपे कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 04:35 AM2020-01-05T04:35:47+5:302020-01-05T04:35:53+5:30

एटीएममधून पैसे काढत असाल तर सावधान...आपल्या अज्ञानाचा किंवा साधेपणाचा गैरफायदा घेऊन भामट्यांकडून आपली फसवणूक व लुबाडणूक होऊ शकते.

Hidden cameras lurk in ATM machines | एटीएम मशीनमध्ये चोरटे लावतात छुपे कॅमेरे

एटीएम मशीनमध्ये चोरटे लावतात छुपे कॅमेरे

Next

- सुनील पाटील 
जळगाव : एटीएममधून पैसे काढत असाल तर सावधान...आपल्या अज्ञानाचा किंवा साधेपणाचा गैरफायदा घेऊन भामट्यांकडून आपली फसवणूक व लुबाडणूक होऊ शकते. अलीकडच्या काळात राज्यच नव्हे, तर देशभरात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, डोळ्याने कमी दिसणारे, कमी शिक्षण झालेल्या व्यक्तीच मोठ्या प्रमाणात शिकार होऊ लागल्या आहेत. कळत न कळत आपल्या खात्यातून लाखो रुपये काढले जात आहेत. काही घटना लगेच उघड होतात तर काही घटना निदर्शनास यायला वेळ लागतो. विशेष म्हणजे अशा घटना घडल्यानंतर संशयित अद्यापपर्यंतही निष्पन्न झालेले नाहीत. कधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या असतील तरीही त्यांच्यापर्यंत पोलीस पोहचू शकलेले नाहीत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना अतिशय सतर्कता बाळगावी लागणार आहे. चोरी, दरोडा व घरफोडीनंतर हा नवा फंडा अवलंबला जात आहे. बॅँकेकडूनही आपणास मदत मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे एटीएम कार्डधारकालाच जागृत रहावे लागणार आहे.
>लुबाडणूक झाल्यानंतर भामटे शहरच सोडून पसार होतात
ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करुन ‘काका मी तुम्हाला मदत करतो’ माझ्याजवळ कार्ड द्या..मी तुमचे पैसे काढून देतो असे सांगून जळगाव जिल्ह्यात अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. ही गुन्ह्याची पध्दत एकट्या जळगावपुरता मर्यादीत नसून राज्य व देशात सुरु आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात यात संशयित चोरटे हे परप्रांतीयच असल्याचे निष्पन्न झालेले आहेत. एका शहरात गंडविण्याचा प्रकार घडल्यानंतर ते वर्ष, दोन वर्ष त्या शहरात किंवा जिल्ह्यात फिरकत सुध्दा नाहीत.जळगाव जिल्ह्यात घडलेल्या घटनांपैकी एकही घटना उघडकीस आलेली नाही. बॅँकांनीही अशा घटनांमध्ये हातवर केले आहेत. विशेष म्हणजे या एटीएम व डेबीट कार्डाच्या माध्यमातून मॉलमधून खरेदीही केली जाते.
>काय खबरदारी घ्याल...आपल्या मागे कोण थांबलेले आहे, याची माहिती ठेवा. शक्यतो अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले एटीएम कार्ड देवू नका. एटीएमची पुरेशी माहिती नसेल तर जवळच्या नातेवाईकाला सोबत आणा व आपले कार्ड आपल्याच हातात ठेवा.गोपनीय कोडही आपणच टाकावा. मशीनमध्ये कुठे गुप्त कॅमेरे नाहीत ना? याची खात्री करा.
>एटीएम मशीनमध्ये गुप्त कॅमेरेही
अनेक घटनांमध्ये असेही निष्पन्न झाले आहे की, काही भामटे एटीएम मशीनमध्ये बारीक स्वरूपाचा कॅमेरा बसवितात. त्यातून ग्राहकांचे गुप्त कोड हेरले जातात. त्यानंतर, कार्ड क्लोन किंवा तांत्रिक माहितीचा उपयोग करून त्या कोडच्या माध्यमातून ग्राहकांचे पैसे काढले जातात. असे गुन्हे करणारे भामटे या तंत्रज्ञात अतिशय तज्ज्ञ असतात. सायबर गुन्ह्यात ही पद्धत मोडली जाते. आता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती झालेली आहे. फसवणूक झालेले ग्राहक तेथे तक्रार करू शकतात.
>अशी होतेय फसवणूक
एटीएममध्ये ज्येष्ठ किंवा कमी शिक्षण घेतलेले नागरिक पैसे काढायला गेले असता, भामटे अशा लोकांवर नजर ठेवून असतात. पैसे काढणाºया व्यक्तीच्या मागे थांबून, ‘आजोबा, काका, भाऊ’ असे म्हणत मी तुम्हाला मदत करू का? अशी विचारणा करतात. तंत्रज्ञान फारसे अवगत नसलेल्या व्यक्ती पटकन मदत घ्यायला तयार होतात.
या व्यक्तींजवळील एटीएम कार्ड आपल्या हातात घेऊन मशीनमध्ये कार्ड टाकले जाते. तेथे गोपनीय असलेला पिन कोड संबंधित व्यक्तीला टाकायला सांगितला जातो किंवा आपल्याच हाताने टाकला जातो. विशिष्ट रक्कम काढल्यानंतर ती रक्कम त्या व्यक्तीच्या हातात दिली जाते. नंतर हात चलाखीने ज्येष्ठ नागरिकाजवळील कार्ड स्वत:जवळ ठेवून भामट्याजवळील कार्ड ज्येष्ठ नागरिकाच्या हातात दिले जाते.
या भामट्यांकडे अनेक बॅँकाचे कार्ड असतात, एटीएममध्ये प्रवेश करताना खिशातच ते कार्ड ठेवलेले असतात. मदत करणाºया व्यक्तीजवळ ज्या बॅँकेचे कार्ड असते, त्याच बॅँकेचे कार्ड लुबाडणूक केलेल्या नागरिकाच्या हातात दिले जाते. ही व्यक्ती काही अंतर गेल्यानंतर काही क्षणातच दुसºया किंवा त्याच एटीएममधून त्या कार्डाच्या माध्यमातून रक्कम काढली जाते.
>एटीएममधून पैसे काढताना आपले कार्ड कोणाच्याच हातात देवू नये. चुकून कार्ड दिले गेले व काही संशय आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन तसेच बॅँकेत त्याची माहिती द्यावी. जेणे करुन कार्ड ब्लॉक करता येते व आपली फसवणूक टळू शकते.
-बापू रोहोम, वरिष्ठ पोलीस
निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

Web Title: Hidden cameras lurk in ATM machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.