जामनेर पालिकेने उभारलेला हायमास्ट खांब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 06:21 PM2017-12-01T18:21:11+5:302017-12-01T18:25:18+5:30
जामनेरात पहाटे वर्दळ नसल्याने जीवित हानी टळली
आॅनलाईन लोकमत
जामनेर,दि.१ : नगरपालिकेने पहूर चौफुलीवर पालिका कार्यालयासमोर उभारलेला सुमारे ५० फुट उंचीचा हायमास्ट खांब अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शुक्रवारी पहाटे कोसळला. सुदैवाने यावेळी रस्त्यावर शुकशुकाट असल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. खांब कोसळल्यानंतर विरोधकांनी याला भ्रष्ट विकास कामाचा नमुना असल्याचा आरोप केला.
नगरपालिकेकडून शहरातील कांग नदी पुलावर, भुसावळ चौफुलीवर, पालिका कार्यालयासमोर व शिवाजी नगरजवळ गेल्या महिन्यात हायमास्ट पोलची उभारणी करण्यात आली. एका खांबाचा खर्च सुमारे सहा लाख आहे. शनिवारी पहाटे पालिका कार्यालयासमोरील चौकात लावलेला पोल अज्ञात वाहनाच्या धडकेने कोसळला. ही घटना पहाटे तीन ते चार वाजेदरम्यानची असावी. ही माहिती शहरात समजताच नागरिकांची मोठी गर्दी याठिकाणी झाली.
काँग्रेसचे कार्याध्यक्ष शंकर राजपूत, एस.टी.पाटील, नगरसेवक पिंटू पिप्पड, जावेद मुल्लाजी, शिवसेनेचे अॅड.भरत पवार, पवन माळी व कार्यकर्ते जमा झाले. पालिकेकडून घाईगडबळीत होत असलेल्या कामामुळेच पोल पडल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. याबाबत संबंधित ठेकेदार व अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केले. पालिकेने पोलची उभारणी करताना जमिनीत खोलवर फाऊंडेशन करून उभारणी करणे गरजेचे होते. मात्र मापात पाप करणाºया ठेकेदारांनी निकृष्ठ बांधकाम केल्याचा आरोप विरोधकांनी केला.
दरम्यान पडलेल्या खांब्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास खोळंबली होती. पोलीस निरीक्षक नजीर शेख व पोलीस कर्मचारी तातडीने याठिकाणी पोहचले. पालिकेचे कर्मचारी व जेसीबीच्या सहाय्याने पोल हलविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली.