हायस्कूल बनले दारुड्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:42+5:302021-06-09T04:20:42+5:30
सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूलची इमारत ही लॉकडाऊन काळात दारुडे आणि सटोड्यांचा अड्डा बनली आहे. भरदिवसा या शाळेच्या इमारतीच्या व्हरांड्यावर ...
सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूलची इमारत ही लॉकडाऊन काळात दारुडे आणि सटोड्यांचा अड्डा बनली आहे. भरदिवसा या शाळेच्या इमारतीच्या व्हरांड्यावर दारूच्या बाटल्या फोडून पार्ट्या उडविल्या जात आहेत. याकडे मात्र पालिकेसह संबंधित मुख्याध्यापक, शिक्षकांचे दुर्लक्ष झालेले आहे. वास्तविक गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी या शाळेच्या समोर चोपडा जुना शिरपूर रस्त्यालगत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मधोमध शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी गेटही बांधण्यात आले आहे. ते गेट बंद असून दुसऱ्या बाजूला मात्र बापू डेअरी असलेल्या शॉपिंगच्या उजव्या हाताला रस्ता मोकळा असल्याने त्या बाजूने हे दारुडे आणि सटोडे या इमारतीकडे जात असतात आणि भरदिवसा ग्रुपमध्ये या ठिकाणी दारूच्या बाटल्या फोडून पार्ट्या करीत आहेत. याबाबतीत ज्येष्ठ नागरिक पंडित राजपूत आणि तिलकचंद शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षण सभापतीचे कानावर हात
दरम्यान, ज्येष्ठ नागरिक पंडित राजपूत आणि तिलकचंद शर्मा हे व्यायामाला येत असल्याने त्यांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी नगरपालिकेचे शिक्षण विभागाचे सभापती राजाराम पाटील यांच्या
कानावर हा विषय टाकलेला आहे. मात्र त्यांनीही न ऐकल्यासारखे केल्याने हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनाही वेळोवेळी याबाबत कल्पना दिली असल्याचे पंडित राजपूत यांनी सांगितले आहे.