जळगावात ‘भाजप’मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:19 PM2019-04-04T13:19:57+5:302019-04-04T13:20:37+5:30
आमदार उन्मेष पाटील यांनी स्वत:च केली उमेदवारी मिळाल्याची घोषणा
जळगाव : भाजपमध्ये बुधवारी ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ बघायला मिळाला. पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसून भाजपकडून जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून त्यांच्या जागी चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार उन्मेष पाटील यांना संधी देण्याच्या हालचाली बुधवारी दिवसभर सुरू होत्या. सायंकाळी चाळीसगाव येथे स्वत: उन्मेष पाटील यांनी कार्यकर्त्यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याची माहिती दिली. तसेच गुरूवारी उमेदवारी दाखल करणार असल्याचे सांगितले.
जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ व रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार रक्षा खडसे या २८ रोजी उमेदवारी दाखल करणार अशी पक्षातर्फे घोषणा करण्यात आली होती मात्र स्मिता वाघ यांचा २८ चा मुहूर्त हुकला त्यांनी २९ ला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांच्या एबी फॉर्मवर प्रश्न उपस्थित झाला.
उमेदवारी अर्जाबरोबर त्यांनी एबी फॉर्म दिला नसल्याची चर्चा सुरू होताच पक्षाचा एबी फॉर्म घाईघाईने देण्यात आला.
स्मिता वाघ यांचा पत्ता कट: आज उमेदवारी अर्ज
स्मिता वाघ यांनी अर्ज भरल्यानंतर प्रचारही सुरू केला होता. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांचा पत्ता कट करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. बुधवारी ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ होऊन वाघ यांची उमेदवारी कापण्यात येऊन त्यांच्या जागी चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारीचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत होते. उन्मेष पाटील यांनीही त्यास दुुजोरा दिला. तसेच गुरूवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करू असे सांगितले.
बंड शमविण्याचे षडयंत्र
खासदार ए.टी. पाटील यांनी पारोळ्यात २७ रोजी समर्थकांची सभा घेतली त्यावेळी त्यांनी आपल्याला नाही तर वाघ यांनाही उमेदवार देऊ नका. आमदार उन्मेष पाटील यांना संधी दिली तर चालेल अशी भूमिका घेतली होती. नेमके हेच हेरून उन्मेष पाटील यांची उमेदवारी दाखल करून नंतर माघार घ्यायची अशी खेळी भाजपची असू शकते अशी चर्चाही सुरू आहे.
उन्मेष पाटील यांच्या कार्यालयाजवळ जल्लोष
चाळीसगाव : आमदार उन्मेष पाटील यांना जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी मिळत असल्याचे त्यांनी सांगताच येथे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. आमदार पाटील यांच्या चाळीसगाव येथील संपर्क कार्यालयाजवळ समर्थकांची गर्दी झाली होती. यावेळी फटाके फोडून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जल्लोषही केला. बुधवारी दिवसभर संपूर्ण तालुक्यात आमदार उन्मेष पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याचे मेसेज सोशल मिडियावर सुरू होते. सायंकाळी पक्षश्रेष्ठी त्यांची उमेदवारी जाहीर करतील. असे देखील सांगितले जात होते. मात्र सायंकाळी सात वाजता स्वत: उन्मेष पाटील यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गुरूवारी पक्षाच्या आदेशानुसार आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पं.स.चे उपसभापती संजय पाटील, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक विजया पवार, चंद्रकांत तायडे, अरुण अहिरे, विजया प्रकाश पवार, नितिन पाटील, पं.स.चे माजी सदस्य दिनेश बोरसे आदी उपस्थित होते.
पुन्हा एबी फॉर्म देता येतो
राजकीय पक्षाने उमेदवारी दिलेल्या पक्षास एबी फॉर्म दिल्यावरही उमेदवार बदलता येऊ शकतो असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. उमेदवारी बदलायची असल्यास पहिल्या उमेदवारास एबी फार्म दिला असला तरी दुसऱ्या उमेदवारास एबी फॉर्म देऊन त्यात दुसऱ्या कॉलममध्ये पहिल्या उमेदवारास दिलेला एबी फॉर्म रद्द करण्यात येत असून आता दिलेला उमेदवार पक्षाचा अधिकृत असल्याबाबत उल्लेख करावा लागतो. एबी फॉर्मवर देणाºया पदाधिकाºयाची म्हणजे प्रदेशाध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक असते.
दोघांचे बंड
आमदार स्मिता वाघ यांचे पती व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनीच आपल्या विरूद्ध षडयंत्र रचून उमेदवारी मिळू नये असा आरोप करून खासदार ए.टी. पाटील यांनी बंडाचा ईशारा दिला होता. त्या पाठोपाठ अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनीही भाजपाने वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती.
जागा धोक्यात
जळगाव लोकसभा मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला. पक्षाची हमखास निवडून येणारी जागा. मात्र पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही जागा धोक्यात आल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून तातडीने एका दिवसात मतदार संघात सर्वेक्षण करून घेतल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्मिता वाघ यांची उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. सोशल मिडियावर यानिमित्ताने विविध चर्चा दिवसभर सुरू होत्या. अशा पद्धतीने एबी फॉम दिल्यावर बदल कसा? कायद्यात तरतुदी काय? असा या चर्चांचा सूर होता.
पक्षाने स्मिता वाघ यांना अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. त्यानुसारच त्यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी प्रचारालाही प्रारंभ केला आहे. उमेदवारी बाबत सोशल मिडियावर केवळ अफवा पसरविल्या जात आहेत.
-उदय वाघ, जिल्हाध्यक्ष भाजपा.
पक्षाने जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरायला सांगितले आहे. त्यामुळे सुचनेचे पालन करुन गुरुवारी अर्ज दाखल करु.
-आमदार उन्मेष पाटील, चाळीसगाव.
अशी असू शकते शक्यता
आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील किंवा बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील यांना उमेदवारी दिली जावी अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रारंभापासून होती. मात्र ते मान्य न झाल्याने ते नाराज होते. अखेर त्यांच्या हट्टामुळे वाघ यांच्या ऐवजी उन्मेष पाटील हे नाव निश्चित झाल्याचे समजते.