मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जळगावात हाय व्होल्टेज ड्रामा...; नेमकं काय घडलं, पाहा

By अमित महाबळ | Published: June 27, 2023 05:08 PM2023-06-27T17:08:14+5:302023-06-27T17:08:37+5:30

आकाशवाणी चौकात हा हाय व्होल्टेज ड्रामा झाला.

High voltage drama in Jalgaon during the visit of CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जळगावात हाय व्होल्टेज ड्रामा...; नेमकं काय घडलं, पाहा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जळगावात हाय व्होल्टेज ड्रामा...; नेमकं काय घडलं, पाहा

googlenewsNext

जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव शहरातील दौऱ्यावेळी मंगळवारी, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. राज्य सरकारकडून जळगाव जिल्ह्यातील प्रश्न सुटत नसल्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या आंदोलनाआधीच खडसेंच्या मुलीसह अन्य कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती. आकाशवाणी चौकात हा हाय व्होल्टेज ड्रामा झाला.

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी कापसाला सहा हजार रुपये अनुदान मिळावे, जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सुटावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती, अन्यथा काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. सकाळपासूनच पोलिस सतर्क होते. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर लक्ष ठेवून होते.

पोलिसांनी बैठकीतून ताब्यात घेतले

दुपारी ॲड. रोहिणी खडसे, मंगला पाटील, वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी, रिकू चौधरी बैठकीत व्यस्त असताना त्यांची पोलिसांनी धरपकड केली. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांशी झटापट झाली. ताब्यात घेतलेले नेते व कार्यकर्त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेल्याचे आले. मात्र, थोड्याच वेळात त्यांना सोडून देण्यात आले. ते पुन्हा कार्यालयात हजर झाले.

पोलिसांकडून बळाचा वापर

आमदार एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यालयात जमा झाले. कार्यालयातून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना तेथेच रोखून धरले. महामार्गावर येऊ दिले नाही.

उपमुख्यमंत्री पहात निघून गेले...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा येताच आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. काळी रिबिन बांधलेले फुगे आकाशात सोडण्यात आले. उपमुख्यंत्र्यांनी वाहनातूनच या आंदोलनाकडे पाहिले.

कार्यकर्ते महामार्गावर

उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जाताच माजी मंत्री गुलाबराव देवकर व इतर कार्यकर्ते महामार्गावर आले. पोलिसांनी त्यांना मागे हटवले. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा ताफा येणे बाकी होते. वॉर्निंग देणाऱ्या कार एकामागून एक येत होत्या.

अन् मुख्यमंत्र्यांचा ताफा आला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा येताच पुन्हा जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. मुख्यमंत्री चंदेरी रंगाच्या वाहनात पुढील आसनावर बसलेले होते. त्यांचा ताफा निघून गेल्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या बाजूला लावलेला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची माहिती देणारा फलक पाडला.

Web Title: High voltage drama in Jalgaon during the visit of CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.