सर्वाधिक उंचीचे शिवस्मारक सुरतेत, खान्देशी मावळ्यांनी गुजरातमध्ये रचला इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:31 AM2018-02-23T11:31:47+5:302018-02-23T11:36:28+5:30
४६ फूट उंची
कुंदन पाटील / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २३ - श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचा गुजरात राज्यात सर्वाधिक उंचीचा दिमाखदार पुतळा खान्देशी मावळ्यांच्या पुढाकाराने उभारण्यात आला आहे. ४६ फूट उंचीचा या स्मारकासाठी ६५ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
सुरत शहरातील सहारा दरवाजानजीक या शिवस्मारकाला नव्याने साकारण्यात आले आहे.श्री.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक निधी समितीचे अध्यक्ष आणि खान्देशी पूत्र खासदार सी.आर.पाटील, श्री.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष छोटूभाई पाटील आणि महामंत्री मेहुल चौहान यांनी पुढाकार घेत या स्मारकाच्या नुतनीकरणासाठी प्रस्तावाला चालना दिली. त्यानंतर सुरत महानगरपालिकेने या प्रस्तावाला हाताशी घेत स्मारक नुतनीकरणाच्या कामाला प्रारंभ केला.
दिमाखदार सोहळा
शिवजयंतीनिमित्ताने युथ फॉर गुजरातचे प्रमुख जिग्नेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवभक्तांची मोटारसायकल रॅली काढली.त्यानंतर खासदार सी.आर.पाटील आणि महापौर अस्मिता शिरोया यांच्या मुख्य उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला.
लक्षवेधी स्मारक
शिवस्मारकाच्या दोन्ही बाजूला उड्ड्राणपूल आहेत. तर स्मारकाच्या खालच्या भागातून बसेस धावणार आहेत. त्यामुळे हे स्मारकस्थळ भविष्यात देशभरातील शिवभक्तांसाठी आकर्षण ठरणार असल्याचे छोटूभाई पाटील यांनी सांगितले.