कोरोनात सर्वाधिक धोका मधुमेहाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:10+5:302021-04-28T04:17:10+5:30
मधुमेहग्रस्तांना कोरोना झाल्यास होते अडचणीत वाढ, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे निरीक्षण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २०९९ ...
मधुमेहग्रस्तांना कोरोना झाल्यास होते अडचणीत वाढ, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे निरीक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २०९९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्या कोमॉर्बिड म्हणजे इतर आजारांनी झालेल्या मृत्यूंचे प्रमाण १०४५ एवढे आहे. असे असले तरी ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. त्यात कोरोनाने सर्वाधिक बळी हे आधीपासूनच मधुमेहाचे रुग्ण असलेल्यांचा घेतला आहे. त्यासोबतच उच्च रक्तदाब, किडनीचे इतर विकार यामुळेदेखील मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा चांगलाच फैलाव झाला आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाने मृत्यूचे प्रमाण जळगाव जिल्ह्यात चांगलेच वाढले होते. मात्र नंतर रुग्णसंख्या वाढली आणि मृत्यूचा दर कमी झाला. आता १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जोर पकडला आहे. त्यात रुग्णसंख्येसोबतच मृत्यूदेखील वाढले आहेत. दररोज १५ ते २० रुग्णांचे मृत्यू होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत असो वा दुसऱ्या लाटेत ज्यांना आधीपासून मधुमेहाचा आजार आहे, त्यांच्यासाठी कोरोना जास्त घातक बनला आहे. त्यापाठोपाठ ज्यांनी पूर्वी कोणत्याही आजारासाठी स्टेरॉईड घेतले आहे. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे किंवा इतर आजारांमुळे ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली आहे. ज्यांना किडनी आणि यकृताशी संबंधित आजार आहेत, अशा रुग्णांसाठी कोरोना जास्त घातक ठरतोय. हे सर्व आजार असतील आणि रुग्णांनी वेळेवर औषधोपचार घेतले नाहीत. तर रुग्ण गंभीर होतो. बहुतेक वेळा औषधोपचारांनाही प्रतिसाद देत नाही. हळूहळू रुग्णाच्या इतर अवयवांवरदेखील त्याचा ताण पडतो. आणि मल्टीपल ऑर्गन फेल्युअर होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो.
इतर आजार असलेल्यांनी काय करावे?
विनाकारण बाहेर पडू नये
मास्क वापरावा, हात वेळोवेळी धुवावे
लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करावी
कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर सिक्स मिनीट वॉक टेस्ट करावी
वेळेवर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे
आहारात व्हिटामिन सी आणि झिंक यांचा समावेश असावा
सध्याच्या दिवसांमध्ये पाणी जास्त प्यावे
कोविडने झालेले मृत्यू
एकूण मृत्यू - २०९९
५० पेक्षा जास्त वय असलेले - १७३२
इतर गंभीर आजार असलेले - १०४५
कोट - कोरोनाच्या मृत्यूंमध्ये कोमॉर्बिड रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी जळगाव जिल्हास्तरावर, जीएमसी स्तरावर तसेच तालुका स्तरावर डेथ कमिटी आहे. रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल तर अडचणी वाढतात. त्यातही मधुमेह, रक्तदाब आणि पूर्वी ज्यांनी स्टेरॉईड घेतले असेल त्यांना कोरोनामुळे जास्त त्रास होऊ शकतो. जिल्ह्यात झालेल्या मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू हे कोमॉर्बिड रुग्णांचे आहे.
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक